महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनतर्फे ॲड. सुमित सावंत यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

माळशिरस (बारामती झटका)
नोटरी बांधवांच्या हक्क, कल्याण आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या “महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन” तर्फे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. सुमित राजू सावंत (रा. माळशिरस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड. यशवंतराव खराडे तसेच सचिव ॲड. प्रविण नलावडे यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले. या नियुक्तीत ॲड. अझरुद्दीन मुलाणी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
ॲड. सुमित सावंत हे माळशिरस तालुक्यातील नामवंत वकील असून, अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच ते माळशिरस तालुका वकील संघटनेचे विद्यमान सचिव म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. न्यायसेवा, संघटनात्मक कार्य, कायदेशीर मार्गदर्शन व सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे.
ॲड. सावंत यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील नोटरी बांधवांचे प्रश्न, अडचणी आणि तांत्रिक बाबींवरील समन्वय व निराकरण अधिक प्रभावी पद्धतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मनोगत व्यक्त करताना ॲड. सावंत म्हणाले, “नोटरी बांधवांच्या प्रतिष्ठा, अधिकार आणि व्यावसायिक एकात्मता मजबूत करण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहणार आहे.”
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



