ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यात राजकीय भूकंप; पानीवचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर!

माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील प्रभावशाली मानले जाणारे पानीव येथील पाटील कुटुंबीय सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

या कुटुंबाचा राजकीय वारसा अत्यंत जुना आहे. १९७७ साली जनता पक्षाकडून श्यामराव पाटील आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जेव्हा माळशिरस तालुक्यात काँग्रेस पक्ष जवळजवळ नामशेष झाला होता, त्या कठीण काळात प्रकाश पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा पुन्हा उंचावला. त्यांनी माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष ते सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असा यशस्वी प्रवास केला आहे.

१९९७ साली सर्व महिला सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून श्रीलेखा पाटील यांनी कार्यभार सांभाळला होता. तसेच २०१२ साली काँग्रेसच्या तिकिटावर माळशिरस पंचायत समिती निवडणूक जिंकून, त्यांनी खुडूस गणात अनेक उल्लेखनीय विकासकामे केली.

स्वातंत्र्यानंतरपासूनच पानीव ग्रामपंचायतीवर पाटील कुटुंबीयांचे प्रभावी वर्चस्व कायम राहिले आहे. तसेच १९९१ मध्ये स्थापन झालेल्या श्रीराम शिक्षण संस्थेमार्फत हजारो विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच तालुक्यातील जवळजवळ १५०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून राज्य व केंद्रात काँग्रेस सत्तेबाहेर असल्याने अनेक विकासकामांना अडथळे आले. तरीही आपल्या सर्वपक्षीय राजकीय संपर्कातून पाटील कुटुंबीयांनी पानीव आणि परिसरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.

दरम्यान, त्यांच्या वरिष्ठ पातळीवरील राजकीय संपर्कामुळे हे कुटुंब गेल्या काही काळापासून भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे त्यांचा लवकरच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रवेशासाठी मोठा जंगी कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

या घडामोडींमुळे माळशिरस तालुक्यातील काँग्रेसचा शेवटचा प्रभावी चेहरा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पाटील कुटुंबीयांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशास हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom