अखेर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला…

प्रदेशाध्यक्ष व अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत पाटील परिवार भाजपमध्ये प्रवेश करणार…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील प्रभावशाली मानले जाणारे पानीव येथील पाटील कुटुंबीय भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होत होती. त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम होणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली होती. आणि आता अखेर पाटील कुटुंबियांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश व श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालय पानीव या महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. श्रीराम शिक्षण संस्था क्रीडांगण, पानीव येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे, जत चे आ. गोपीचंद पडळकर, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार आदी मान्यवर असणार आहेत.
या कुटुंबाचा राजकीय वारसा अत्यंत जुना आहे. १९७७ साली जनता पक्षाकडून श्यामराव पाटील आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जेव्हा माळशिरस तालुक्यात काँग्रेस पक्ष जवळजवळ नामशेष झाला होता, त्या कठीण काळात प्रकाश पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा पुन्हा उंचावला. त्यांनी माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष ते सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असा यशस्वी प्रवास केला आहे.
१९९७ साली सर्व महिला सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून श्रीलेखा पाटील यांनी कार्यभार सांभाळला होता. तसेच २०१२ साली काँग्रेसच्या तिकिटावर माळशिरस पंचायत समिती निवडणूक जिंकून, त्यांनी खुडूस गणात अनेक उल्लेखनीय विकासकामे केली.
स्वातंत्र्यानंतरपासूनच पानीव ग्रामपंचायतीवर पाटील कुटुंबीयांचे प्रभावी वर्चस्व कायम राहिले आहे. तसेच १९९१ मध्ये स्थापन झालेल्या श्रीराम शिक्षण संस्थेमार्फत हजारो विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच तालुक्यातील जवळजवळ १५०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून राज्य व केंद्रात काँग्रेस सत्तेबाहेर असल्याने अनेक विकासकामांना अडथळे आले. तरीही आपल्या सर्वपक्षीय राजकीय संपर्कातून पाटील कुटुंबीयांनी पानीव आणि परिसरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.
तरी या पक्षप्रवेश सोहळा व उद्घाटन समारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. श्रीलेखा प्रकाश पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिषेक प्रकाश पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण प्रकाश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



