ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

सोलापूर (बारामती झटका)

अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळख असलेले सिद्रामप्पा पाटील (वय ८८) यांचे गुरुवारी रात्री सोलापूरमधील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात, तसेच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत अक्कलकोट तालुक्यात भाजपाचा पाया भक्कम केला. भाजपाची संघटनात्मक उभारणी, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देणारे, त्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांचा राजकीय प्रवास गावच्या सरपंचपदापासून सुरू होऊन पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्ष संचालक (एकवेळ उपाध्यक्ष), श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती आणि अखेर अक्कलकोटचे आमदार असा बहुआयामी राहिला.

अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांशी निकटचे संबंध राखले होते आणि भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात.

वयाच्या ८७व्या वर्षापर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. उपचारासाठी सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र गुरुवारी रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिद्रामप्पा पाटील यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्याचे एक खंबीर, प्रामाणिक आणि शेतकरीहितवादी नेतृत्व हरपले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom