निवडणुकीच्या तोंडावर ‘जमीन घोटाळा’ केंद्रस्थानी

नांदेडच्या व्यापाऱ्याची जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; बनावट मुखत्यारपत्राचा पर्दाफाश!
तुळजापूर (बारामती झटका)
तुळजापूर तालुक्यातील खडकी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नांदेड येथील व्यापारी गिरीष दिक्षीत यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोतकर व जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या संशयास्पद प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
▪️जमीन मालक आजारी, संधी साधून कट रचला?
दिक्षीत कुटुंबाची खडकी शिवारातील गट क्र. ४१ मधील ८५ आर जमीन मूळ वडील अशोक गणपतराव दिक्षीत यांच्या नावावर महसूल नोंदवहीत नोंदलेली आहे. वडील अर्धांगवायू व इतर आजारांनी त्रस्त असल्याने हालचाल करणे अशक्य आहे. हीच बाब साधून काहीजणांनी संगनमत करून जमीन हडप करण्याची मोहीम राबविल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
▪️२००५ साली मृत झालेल्या आजीच्या नावावरून खोटे कागदपत्र!
तक्रारीनुसार, दिक्षीत यांच्या आजी यमुनाबाई दिक्षीत या २००५ मध्येच निधन पावल्या. मात्र त्यांच्या नावावरून बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे तयार करून ३० जून २०२५ रोजी दिल्लीतील अजय कुमार यादव यांच्या नावावर खोटे कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले.
या कटात झापु लक्ष्मण राठोड (खडकी), अय्यूब राजन पटेल (बोरामणी), संदीप नवनाथ पाटील (मुळेगाव तांडा) यांच्यासह दुय्यम निबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप दिक्षीत यांनी केला आहे.
▪️सब-रजिस्ट्रार कार्यालयात संशयास्पद खरेदीखत नोंद
या बनावट मुखत्यारपत्राच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी तुळजापूर उपनिबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ५४२१/२०२५ असा संशयास्पद व्यवहार नोंदविण्यात आला. महसूल विभागाकडे फेरफार प्रक्रिया सुरू होताच दिक्षीत यांनी तत्काळ आक्षेप नोंदवला. तपासणीदरम्यान संपूर्ण व्यवहार बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
▪️पोलिसांकडे तक्रार… पण गुन्हा नोंद नाही; नऊ दिवसांपासून मौन का?
सदर प्रकरणाची तक्रार देऊन नऊ दिवस उलटले तरी पोलीस ठाण्याकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी तक्रार करत दिक्षीत यांनी प्रशासनाची ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ भूमिका धारण केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.निवडणुकीच्या तोंडावर असा गंभीर जमीन घोटाळा समोर येत असूनही कार्यवाही न होणे, अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
▪️सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा स्पष्टीकरण
खडकी परिसरातील गट क्र. ४१ संबंधित सादर दस्तांची प्राथमिक छाननी केली असता काही विसंगती आढळल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. कागदपत्रे पुढील तपासासाठी प्रेषित करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे कार्यालयाने स्पष्ट केले.
▪️“नोंदणी कार्यालय कोणत्याही गैरव्यवहाराला पाठबळ देत नाही. पारदर्शक व नियमबद्ध नोंदणी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत”. – बालाजी मादसवार, दुय्यम निबंधक श्रेणी-१, तुळजापूर
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



