फलटण एस. टी. महामंडळाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर…

काळज येथे एसटी बस थांबवण्याच्या प्रस्तावाला केराची टोपली!
काळज (बारामती झटका) वसीम इनामदार यांजकडून
काळज, ता. फलटण गावचे माजी उपसरपंच श्री. सचिन गाढवे पाटील यांनी मागील दहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ फलटण यांना काळज या ठिकाणी फलटण आगाराच्या सर्व एसटी बस थांबावे यासाठी फलटण आगार प्रमुख श्री. चव्हाण साहेब यांना काळज ग्रामपंचायतीचा प्रस्ताव व आमदार सचिन पाटील यांचे निवेदन दिले होते. व मागील दहा महिन्यांपासुन आगार प्रमुखांना वारंवार विनंती करत आहेत. तरीसुद्धा अजूनपर्यंत आगर प्रमुखांनी या विषयावर कोणताही तोडगा काढला नाही.
पुणे-पंढरपूर हायवेलगत काळज हे गाव वसलेले आहे. काळज येथुन काळज, तडवळे, डोंबाळवाडी, घाडगे मळा, नांदल, मुरूम येथील असंख्य विद्यार्थी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक दवाखान्यासाठी, बाजारासाठी, इतर खरेदीसाठी लोणंद, फलटण या ठिकाणी जाण्यासाठी असंख्य प्रवासी प्रवास करत असतात. तसेच या सर्व गावांमधे अनेक पाहुणे मंडळी इतर गावांवरून येत असतात. याचप्रमाणे या सर्व गावातील तरुण वर्ग पुणे, मुंबई, सातारा व अन्य ठिकाणी नोकरी निमित्त याच ठिकाणावरून प्रवास करत असतात. त्यामुळे या सर्वांची खूप मोठी गैरसोय अनेक वर्षापासून होत आहे. तसेच या सर्व गावांची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि या सर्व सामान्य लोकांना दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणासाठी एसटी महामंडळाचा प्रामुख्याने वापर करावा लागत असतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या या दुर्लक्षामुळे काळज व पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये एस टी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिक, महिला, वृद्ध, विद्यार्थी, तरुण वर्ग व शेतकरी यांची होणारी गैरसोय पाहून सामाजिक कार्यकर्ते व काळज गावचे माजी उपसरपंच श्री. सचिन गाढवे पाटील यांनी काळज ग्रामपंचायतीचे प्रस्ताव तसेच आमदार सचिन पाटील यांचे निवेदन फलटण एसटी आगार प्रमुखांना देऊनही व वारंवार विनंती करून सुद्धा आगार प्रमुखांनी याची कोणतीही आजपर्यंत दखल न घेता काळज गावच्या एसटी बस थांबवण्याच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे.
आंदोलनाचा इशारा
माजी उपसरपंच श्री. सचिन गाढवे पाटील यांनी फलटण आगार प्रमुखांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून फलटण एसटी आगाराच्या सर्व गाड्या काळज या ठिकाणी थांबवायला परवानगी द्यावी व सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी त्यांना या बातमीद्वारे विनंती करण्यात येत आहे. या बातमी प्रसिद्धीनंतर आठ दिवसात जर तोडगा काढला गेला नाही तर काळज व पंचक्रोशीतील सर्व गावे मिळून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आगार प्रमुखांना देण्यात आलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



