जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-२ – उषा शिंदे-वाखारे

पुणे (बारामती झटका)
वात्सल्य सिंधू फाऊंडेशन शिरूरच्या सर्वेसर्वा उषाताई यांचे आज शिरूर तालुक्यात नाव आहे. प्रामाणिकपणे व सातत्याने काम करण्याची त्यांची वृत्तीने अतिशय कमी काळात त्यांना आपली ओळख निर्माण करून दिली.
१९७२ च्या भयंकर दुष्काळात उषाताईंच्या आजोबांनी पुण्याच्या ग्रामीण भागातून मुंबईला रोजगाराच्या आशेने संपूर्ण कुटुंबासह स्थलांतर केले व तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इयत्ता १२ वी पर्यंत उषाताईंची घरची हलाखीची परिस्थिती थोडी निवळली होती. पण परिस्थितीचे चटके मात्र जाणवत होते त्यामुळे कुटुंबियांनी मुलीला लग्नानंतर शिकवावे या अटीवर शैलेंद्र वाखारे यांच्याशी त्यांचा विवाह करून दिला. उषाताईंची जडणघडण मुंबईत झालेली, मात्र लग्नानंतर शिरूर सारख्या ग्रामीण भागात नव्या संसाराची सुरुवात झाली आणि त्यांनी आपले पुढील शिक्षण देखील सुरू केले.
कामा- शिक्षणानिमित्त घराबाहेर पडत असताना उषाताईंना तेथील बालकांची दयनीय अवस्था दिसू लागली, अस्वस्थ करू लागली. त्यांना काही मुलं भिक्षा मागताना दिसली. अनवाणी पायांनी आणि फाटक्या तुटक्या कपड्यांवर भटकणाऱ्या मुलांना निश्चितच शिक्षणाविषयी अनास्था असेल, या अनास्थेचं कारण अर्थातच शिक्षणाविषयी कुटुंबाची उदासिनता, शिक्षणाच्या आवश्यकतेविषयी अज्ञान अशा अनेक कारणांचा शोध उषाताई घेऊ लागल्या. येथील बहुसंख्य मुले ही मदारी, पारधी, वडार, वैदू, भिल्ल, आदिवासी, ठाकर या भटक्या विमुक्त समाजातील अधिक होती. आपल्याला काही करता येत नाही ही खंत त्यांनी आपल्या घरी बोलून दाखविली. कुटुंबाने त्यांना समर्थन देऊन, ‘तुला या मुलांसाठी काही करता आलं तर कर त्यासाठी आमचा तुला पाठिंबा आहे’ असा विश्वास दिला.
उषाताईंनी शिरूर शहरात व आसपासच्या वाड्या वस्तीत अशी किती मुले आहेत की जे शाळेपासून वंचित आहेत याची माहिती घेऊन या मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर ही मुलं सकारात्मक प्रतिसाद देत नसत किंवा काही प्रश्न विचारले असता तेथून पळून जात असत. या कारणामुळे उषाताईंनी अशा मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या पालकांचे शिक्षणासाठी मन वळविण्याचे ठरविले. पण या मुलांना त्यांचे पालक मुद्दाम शाळेत पाठवीत नसल्याचे लक्षात आलं. ही मुलं बस स्टॅन्ड, चावडी आणि ठराविक गजबजलेल्या ठिकाणी येथून भिक्षा मागतात, कोणी काही खायला दिलं तर ते स्वीकारतात आणि त्यातील रक्कम किंवा खाऊ घरातील मंडळींना आणून देतात त्यामुळे घरातील लोक या लहान मुलांना पैसे आणि जेवण कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. त्यामुळे अशा मुलांना शाळेमध्ये पाठवायला त्यांचे पालक इच्छुक नसतात. खरंतर ही वस्तुस्थिती जेव्हा ताईंच्या लक्षात आली तेव्हा खूप काम करणं गरजेचे आहे हे त्यांना समजले. खरंतर अशा पालकांमध्ये व्यसनांचे प्रमाण जास्त आहे त्याला महिला देखील अपवाद नव्हत्या. अशा वेळेस त्यांना विश्वास वाटावा यासाठी त्यांना उषाताईंनी शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र इ. अनेक सरकारी कागदपत्र त्यांना सहज उपलब्ध होईल यासाठी वेगवेगळे कॅम्प आयोजित केले. ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळू लागला. यामुळे या मुलांच्या पालकांच्या मनात उषाताईंविषयी आपुलकीची भावना निर्माण होऊ लागली. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरता ताईंनी प्रौढ शिक्षण वर्ग वस्ती पातळीवर सुरू केले. जी लोक वाचू शकत नव्हती किंवा लिहू शकत नव्हती अशी लोकं आपापली सही करू लागली याचा त्या लोकांना खूप आनंद झाला. याच दरम्यान भरपूर पालकांनी आपापली मुले शाळेत घातली. जेथे ९०% शाळाबाह्य मुले होती तेथे आज ५०% मुलं शाळेत जातात.
आज ही मुले भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहतात तेव्हा वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या सदस्यांना खूप आनंद होतो. आता या लोकांनी उषाताईंकडे रोजगाराची मागणी केली. त्यांना रोजगार मिळाला तर त्यांची परिस्थिती सुधारेल आणि शिक्षणाविषयी अधिक जागृती त्यांच्या मनात निर्माण होईल हे जाणून ताईंनी रोजगार कौशल्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. यात दिवे, मेणबत्ती, अगरबत्ती बनविणे, महिलांना गोधडी बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. जे उत्पादन तयार केले ते विकण्यासाठी ‘उडान’ नावाचा उपक्रम सुरू करून हक्काची बाजारपेठ निर्माण करून दिली. वेगवेगळ्या सणांच्या मुहूर्तावर गरजेनुसार महिलांना साहित्य विकण्यासाठी स्टॉल लावणे जसे की दिवाळीमध्ये फटाके स्टॉल, आकाश कंदील स्टॉल, रक्षाबंधनाला राखी स्टॉल लावणे इ. ह्यातून आलेल्या पैशाचा योग्य विनियोग होऊन महिला आर्थिक साक्षर होतील यासाठी स्वयंसहायता बचत गट सुरू केले. सरकारी योजनांचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न केले. महिलांना बचतीची सवय लागली. हे पाऊल स्वावलंबनाकडे घेऊन जाणारे ठरले.
शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले काम गरजू समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांना स्पर्श करेल याची खात्री ताईंना होती. कामाचा व्याप आणि वाढता विस्तार लक्षात घेता आठ वर्षांपूर्वी उषाताईंनी वात्सल्यसिंधू फाऊंडेशनची स्थापना केली. समाजातील वंचित घटकांसाठी ही संस्था काम करत आहे. त्यांनी निराधार, विधवा, परितक्त्या, आबाल वृद्ध महिला, अनाथ मुले यांना गरजेप्रमाणे शिक्षण, हक्काचा आधार आणि रोजगार देण्यासाठी ‘माझं घर’ नावाच्या संस्थेची इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. ह्या सामाजिक कामामुळे आजपर्यंत भरपूर पुरस्कार आणि सन्मान ताईंना लाभले आहेत. समाजात त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाची व सचोटीची जाणीव असल्याने, अनेक लोकांनी संस्थेच्या इमारतीसाठी देणगी देऊ केली. लवकरच या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
“भविष्यात देखील समाजातील वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणे. शिक्षण आणि रोजगार ह्यासाठी लढा देणे आणि वंचित घटकाला त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी वात्सल्यसिंधू फाऊंडेशन नेहमीच आपले कर्तव्य पार पाडेल” असे त्या अतिशय प्रामाणिकपणे सांगतात.
सुरुवातीला वंचित समूहातील वीटभट्टी कामगारांची, ऊसतोड कामगारांची, कचरावेचक कामगारांची, घर काम करणाऱ्या महिलांची अशा सर्व मुलांसाठी वस्ती शाळा सुरू केल्या.
मदारी समूहाची मुलं शाळेत जात नाही त्यांच्या वस्तीवर अजूनही कोणी सातवीच्या पुढे मुलगा शिकलेला नाही त्यांच्या वस्तीवर प्रौढ व्यक्तींमध्ये मोजून आठ ते दहा लोक शिकलेली असतील. त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड पॅन कार्ड या सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता नाही आणि त्यामुळे या समुदायाला भटकंती आणि भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या समुदायांमध्ये बालविवाह, लहान मुलांमध्ये असणारी व्यसनाधीनता, बालमजुरी तसेच जात पंचायत हे अनेक मुद्दे आहेत. यासाठी त्यांच्यातीलच नेतृत्व पुढे निर्माण करायचा प्रयत्न ताई फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहेत.
आजवर ताई करत असलेल्या कामासाठी त्यांना वारसा फाऊंडेशनचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, सुषमा स्वराज पुरस्कार, आधार छाया फाऊंडेशन आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार, युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आंबेगाव, राजमाता जिजाऊ माता पुरस्कार,
शिरूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२४, जल ॲम्बॅसिडर, वैभवी पतसंस्था उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, शक्तिधात्री महिला उद्योग समूह शक्तिदात्री सेवावृत्ती पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंती समिती भीमरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
ताईंचे पती शेती करतात व ताई सामाजिक कार्य. दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सामाजिक जाण व भान ठेवून आयुष्यभर सामाजिक कामात ताईंनी झोकून द्यायचे ठरवले आहे. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



