बदलीसाठी ३ लाखांची लाच घेताना पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य सेवक ACB च्या सापळ्यात

पुणे (बारामती झटका)
उपसंचालक आरोग्य विभाग, पुणे यांच्याकडे बदली करून देण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणी व स्वीकार केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील एका आरोग्य सेवकावर अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.
याप्रकरणी रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३, आरोग्य सेवक, जिल्हा परिषद पुणे – वर्ग ३) यास बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद पुणे येथील आरोग्य सेवक असून, जून २०२५ मध्ये त्यांची कोल्हापूर मंडळातून पुणे मंडळात अंतरमंडळ बदली झाली होती. मात्र, पुणे मंडळात प्रत्यक्ष पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवक पदावर नियुक्ती मिळावी यासाठी विनंती अर्ज केला होता.
या कामासाठी उपसंचालक आरोग्य, पुणे मंडळ यांच्यासाठी ३ लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी आरोपी आरोग्य सेवक रामकिसन घ्यार याने केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने दि. २ डिसेंबर २०२५ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीनंतर दि. ४ व ५ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद पुणे कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून आरोपीने ३ लाख रुपये लाच स्वीकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद लोणारे व पोलीस निरीक्षक श्रीमती आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा खाजगी इसम (एजंट) शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
संपर्कासाठी :
अँटी करप्शन ब्युरो, पुणे
दूरध्वनी : 020-26122134 / 26132802 / 26050423
व्हॉट्सॲप : 9403781064
ई-मेल : dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



