जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-५ – डॉ. बेनझीर तांबोळी

पुणे (बारामती झटका)
आज हिंदू-मुस्लीम धर्मात जाणीवपूर्वक निर्माण केल्या जाणाऱ्या द्वेषमूलक वातावरणात मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणारे डॅा. बेनझीर व डॅा. शमसुद्दीन तांबोळी या उभयतांना गेल्या विसेक वर्षापासून मी ओळखते. काही माणसांचा, त्यांच्या विचारांमुळे व कृतीमुळे प्रचंड आदर वाटतो, अशा काही मंडळींपैकी ही एक जोडी. ज्या जमातीविषयी अनेक लोक समाजात विविध गैरसमज पसरवत असतात, त्याच जमातीतील डॅा. बेनझीर तांबोळी यांचा शैक्षणिक व सामाजिक आलेख पाहता त्यांच्याविषयीचा आदर अधिक दुणावतो.
एम. ए. (इंग्रजी), एम. ए. (मराठी), एम. एड, सेट, पीएच डी. हा त्यांचा शैक्षणिक प्रवास. डॉ. बेनझीर तांबोळी यांचा शिक्षण, साहित्य, समाजप्रबोधन या क्षेत्रात सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांचे आईवडिल शिक्षकी पेशातील असल्याने त्यांना सुशिक्षित, मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात वाढताना खुले, प्रोत्साहनात्मक वातावरण लाभले. परंतु परंपरावादी कुटुंबात झालेल्या पहिल्या विवाहानंतर झालेला तलाक, त्यातून निर्माण झालेली वैयक्तिक आणि कौटुंबिक अस्थिरता व कटू अनुभवामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. व्यक्तिगत मानसिक ताण, नातेवाईक आणि समाजाचा दबाव तसेच भविष्यातील अनिश्चितता यांना तोंड देत त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. आईवडीलांनी दिलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे त्यांनी धाडसाने या दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले. स्वावलंबनाची ओढ आणि योग्य निर्णयक्षमता यामुळे त्यांची पुढची वाटचाल सुकर झाली. कितीही कठीण प्रसंग आले, तरी त्याला टक्कर देण्याची हिंमत, खंबीर मानसिकता, आत्मविश्वास आणि शिक्षणामुळेच मिळते. तसेच ‘आर्थिक स्वावलंबन स्वतःचा आवाज बळकट करते’ ही त्यांची धारणा, कठीण काळातील अनुभवातूनच घडली आहे. त्यांचा स्वभाव मुळातच लढणारा असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला.
कालांतराने सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची साथ आणि सहकार्यामुळे त्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक दृढ होत गेले. बी.एड., एम.एड., सेट परीक्षा आणि पीएच.डी. या टप्प्यांवर त्यांचा त्यांना कायम पाठिंबा मिळाला. विवाहानंतर स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय त्यांनी खूप विचार करून घेतला जो कुटुंबातील अनेकांना रुचणारा नव्हता. तरीही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पतीची योग्य साथ त्यांना मिळाली.
आंतरधर्मीय विवाहाच्या निमित्ताने अनेक तरुण तरुणी भावनिकतेने जोडले गेले आहेत. त्यातून त्यांचा एक मोठा परिवार तयार झाला आहे.
अध्यापन आणि भाषा अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये काम केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि अन्य महाविद्यालयांमधील अध्यापन, तसेच एमकेसीएलच्या शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडल्या गेल्या. इंग्रजी, मराठी आणि शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासोबतच भाषा कौशल्य विकसनावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. विविध परीक्षांसाठी प्रभावी प्रश्ननिर्मिती कशी करावी व सर्वंकष मूल्यमापन यावर शिक्षकांसाठी त्या विशेष मार्गदर्शन करतात. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांत भाषांतर, मुद्रित शोधन व संपादन त्या अचूक करतात. सुरुवातीला कोल्हापूर येथे त्यांनी इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर त्या पुण्यात आल्यावर त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कामाचा परिघ वाढत गेला. पुण्यात त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी अध्यापक म्हणून जोडल्या गेल्या. दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात त्या चर्चा व परिसंवाद यात सहभागी होतात. विविध विषयांवर त्या व्याख्याने व लेख लिहितात.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामामुळे त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. त्या विविध कामात कायम सक्रिय आहेत. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या फातिमाबी शेख मुस्लीम महिला मंच आणि हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम यामाध्यमातून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुस्लीम समाजातील पारंपरिक प्रश्न आणि आजचे वास्तव, मुस्लीम महिलांचे अधिकार आणि मुस्लीम समाजातील अपेक्षित सकारात्मक बदल, मुस्लीम महिलांच्या शैक्षणिक – सामाजिक समस्या, तोंडी तलाकसारखे प्रश्न, तसेच वंचितांच्या शैक्षणिक अडचणी यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेकांगी कार्य केले आहे. विविध नियतकालिके, विशेषांक, वर्तमानपत्रे यामध्ये त्या प्रासंगिक लेखन करत असतात. मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादन सहाय्य आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या द्विखंडात्मक इतिहासाच्या संपादनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणशास्त्र शब्दकोश ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. समान नागरी कायदा – अपेक्षा व वास्तव, तिमिरभेद ही दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. त्यांचा मुस्लीम प्रश्नावरील अनुवादित कथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न हाताळले आहेत. प्रबोधनाची व परिवर्तनाची कास धरल्याने त्या सर्वधर्मीय चळवळी व संघटना यांच्याशी निगडीत आहेत.
सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम, बकरी ईदनिमित्त रक्तदान अभियान, संविधान साक्षरता अभियान यांसारख्या समाजप्रबोधन व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळ प्राधान्याने जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य, आंतरधर्मीय–आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देते. याविषयावर कार्य करणाऱ्या विविध राज्यातील संघटनांचे ‘चयन’ हे राष्ट्रीय संघटन उभे राहिले आहे. पुणे, लखनौ, कोलकाता, हैद्राबाद याठिकाणी झालेल्या परिषदांच्या समन्वयात महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन यानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे संपादन त्यांनी केले आहे. त्या करत असलेले काम हे देशव्यापी आहे. ध्येयवादी प्रामाणिक प्रयत्नातून समाजासाठी चाललेली त्यांची ही वाटचाल अनेकांना दिशादर्शक आहे. त्यांना नवी दिल्ली येथे साहस सन्मान, दौंड येथे जागर सन्मान, पुणे येथे सेवाव्रती महिला पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत.
आजच्या सामाजिक परिस्थितीत समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी डॅा. बेनझीर तांबोळी यांच्यासारखे अनेकजण कार्यरत आहेत. त्यांचे कार्य समजून घेणे व ते इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.
आयुष्यात आलेल्या काही समस्या व संघर्ष यावर मात करून डॅा. बेनझीर यांनी केलेली आपली शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक वाटचाल ही लक्षणीय आहे. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



