ताज्या बातम्यासामाजिक

सोलार सिस्टीम मंजुरीसाठी ३ हजारांची लाच;

महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर (बारामती झटका)

घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जुळे सोलापूर येथे करण्यात आली असून आरोपीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकसेवक श्री. अमित विलासराव रेडेकर (वय ४२) असे असून ते महावितरण शाखा कार्यालय, जुळे सोलापूर येथे सहायक अभियंता (वर्ग-२) म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते फ्लॅट नं. ५०२, गॅलेक्सी अपार्टमेंट, सिंधु विहार, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव रेडेकर गल्ली, उचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर आहे.

तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरावर सोलार सिस्टीम बसविण्याचे काम करतात. जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर ३.५ किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसविण्यासाठी त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आरोपी अमित रेडेकर यांच्याकडे होती. मात्र, अर्जास मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट एक हजार रुपये याप्रमाणे तीन किलो वॅटसाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.
याबाबत तक्रारदाराने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली असता आरोपी अमित रेडेकर यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून ३,००० रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे सुरू आहे. सदर कारवाई श्री. शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर हे करीत आहेत.

ही कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे व श्री. अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत श्री. रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही लाचेची मागणी झाल्यास टोल फ्री क्रमांक १०६४, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९४०४००१०६४, तसेच www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा acbmaharashtra.net या अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने काम करणारा कोणताही खाजगी इसम जर कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी अजिबात भीती न बाळगता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस कारवाई शक्य होत आहे,”
— प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom