नांदेड येथील रामीनवार परिवाराचा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी स्तुत्य उपक्रम.
मोरोचीचे माजी सरपंच जालिंदर सुळ पाटील यांचे उपक्रमाला मोलाचे सहकार्य आहे.
नातेपुते ( बारामती झटका )
नांदेड येथील उद्योजक भारत रामीनवार यांचा कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक भक्तांसाठी स्तुत्य उपक्रम गेली सहा वर्ष सुरू आहे. मोरोची गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते जालिंदरतात्या सुळ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हजारो भाविक स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेत आहेत.


नांदेड येथील उद्योजक भारत रामिनवार यांच्या परिवारातील धर्मपत्नी सौ. मीराताई भारत रामिनवार, मुलगी व जावई सौ. शिल्पा व श्री. पंकज पोकलकर, सून व मुलगा सौ. अमृता व श्री. पद्माकर भारत रामीनवार, सौ. प्रतिभा व श्री. संदीप भारत रामीनवार यांच्यासह मित्रपरिवार त्यामध्ये रमेश भांड, विठ्ठल पाटील, विठ्ठल हेळगिरे, हनुमंत गादेवार, प्रकाश गव्हाणे यांच्यासह 25 ते 30 कर्मचारी अहोरात्र कष्ट करीत आहेत.
वारकरी व भाविक भक्तांसाठी भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा असे वारकऱ्यांच्या आवडीचे गरमागरम पदार्थ बनवण्याचे काम सुरू आहे. मोरोची पंचक्रोशीतील 400 महिला भाकरी बनवण्याचे काम करीत आहेत आचारी पिठलं व ठेचा बनवत आहे. सदर ठिकाणी अन्नदानाचा तीन दिवस व दोन रात्री अखंड उपक्रम सुरू असतो. यासाठी 12 टन ज्वारीचे पीठ, दीड टन बेसन पीठ, पाच क्विंटल खोबरे, एक टन हिरवी मिरची, दोन क्विंटल शेंगदाणे, दोन क्विंटल लसूण, तेलाचे 15 डबे, एक टन कांदा असे साहित्य बरोबर आणलेले आहे.


मोरोची येथील जालिंदरतात्या यांच्या पुणे-पंढरपूर रोडवरील जागेत सदरचा अन्नदानाचा उपक्रम सुरू आहे. भव्य मंडप उभारलेला असून पावसापासून बचाव व्हावा यासाठी पत्र्याची सोय केलेली आहे. महिलांना भाकरी करण्याकरता स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तयार झालेल्या भाकरी व्यवस्थित ठेवण्याकरता जागा केलेली आहे. आचारी गरमागरम पिठले बनवत आहेत. कांदा, मिरची, लसूण, टोमॅटो सर्व पदार्थ दर्जेदार खरेदी केलेले आहेत. वारकरी व भाविक आनंदाने या स्तुत्य उपक्रमाचा उपभोग घेत आहेत.


भारत रामीनवार यांची प्रतिकूल परिस्थितीत हलाक्याची व बेताची होती. उद्योग व्यवसायामध्ये अहोरात्र कष्ट करून प्रगती साधलेली आहे. गरिबीची व परिस्थितीची जाणीव असल्याने ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या भाविकांना अन्नदान करून सेवा करण्याचा उद्देश आहे निस्वार्थीपणे गेली सहा वर्षापासून त्यांचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्यांना जयवंततात्या पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
