आमचं ठरल…, पुरंदावडे सदाशिवनगर येथील व्यापारी, स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांचे रास्ता रोको करण्याच ठरलं
उड्डाण पूल संघर्ष समिती पुरंदावडे सदाशिवनगर समितीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे यांची एकमताने निवड
सदाशिवनगर ( बारामती झटका )
देहू-आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर सदाशिवनगर पुरंदावडे गावातून जाणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. 965 वरील उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलममध्ये तयार करावा यासाठी पुरंदावडे सदाशिवनगर गावातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये उड्डाणपूल संघर्ष समिती सदाशिवनगर पुरंदावडे अशी सर्वानुमते संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सदर बैठकीस व्यापारी, स्थानिक नागरिक व सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष पुरंदावडे गावचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ नेते सूर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी हनुमंत अरुण धाईंजे, डॉ. गोरख सोनटक्के, ज्ञानेश्वर राऊत, सुभाष राऊत, संतोष शिंदे, बाहुबली दोशी, मारुती भुजबळ, अक्षय धाईंजे, सौरभ जाधव, पांडुरंग ढगे, रणजीत जितेंद्र सालगुडे, दिग्विजय गुलाब सालगुडे, संग्राम शामराव सालगुडे, तनवीर हसन शेख, अमोल गंगाराम धाईंजे, केतन राजेश डुडू, सुहास विठ्ठल सुळे, सूरचंद गौतमचंद गांधी, स्वप्नील कांतीलाल गांधी, विरकुमार अनंतलाल दोशी, ताराचंद दोशी, प्रेमचंद देवचंद दोशी, तुषार अशोक ढेकळे, उदय गुलाब सालगुडे पाटील, जयदीप सालगुडे पाटील, विनायक पुंडलिक पवार, योगेश बबन शिंदे, विशाल प्रताप सालगुडे पाटील, वैभव मारुती रिसोडकर, नागनाथ ओवाळ, हरिभाऊ विठ्ठल पालवे, माजी सरपंच तानाजी पालवे, सोमनाथ शंकर राऊत, बाळासाहेब दिनकर पाटील, पुरंदावडेचे सरपंच बाळासाहेब उर्फ देविदास महादेव ढोपे, आदी उपस्थित होते. यावर सर्वांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.
समितीची स्थापना झाल्यानंतर लगेचच सर्वांनी मिळून शनिवार दि. 23/07/2022 रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे पत्र जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आलेले आहे. सदर पत्राची प्रत प्रकल्प संचालक एन.एच.आय. पंढरपूर, उपविभागीय अधिकारी अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांना प्रति देण्यात आलेल्या आहेत.
सदर दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामपंचायतच्या हद्दीतून प्लेटचा उड्डाणपूल जात आहे. यामुळे दोन्ही गावचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर सर्व व्यापारी वर्गाचे गावातील रहिवाशांचे अतोनात नुकसान होणार आहे. कारण सदाशिवनगर पुरंदावडे गाव हे ज्यादा प्रमाणात रोडच्याकडेला वसलेले आहे. सदर ठिकाणी साखर कारखाना अंगणवाडी ते बारावीपर्यंत विद्यालय आहे. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर कारखाना चालू सीझनमध्ये बैलगाडी, घंटागाडी, ट्रॅक्टर व ट्रक मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक करत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. साखर कारखाना व मोठी शाळा असल्यामुळे परिसरातील दहा ते पंधरा गावातील शेतकरी सदाशिवनगर पुरंदावडे या ठिकाणी येत असतात. तरी स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी वर्ग या सर्वांची एकच मागणी आहे की, प्लेटचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल करण्यात यावा. नाही तर, ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत. सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने शनिवार दि. 23/07/2022 रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे, असा पत्र व्यवहार केला आहे.
पुरंदावडे ग्रामपंचायतचे सरपंच देविदास महादेव ढोपे यांनीही पत्र दिलेले आहे. त्यामध्ये पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिला गोल रिंगण सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक व वारकरी सांप्रदाय येत असतो. परंतु पुरंदावडे या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यानंतर एकाच बाजूने भाविक व वारकऱ्यांना जावे लागणार आहे. तरी रिंगण सोहळा पाहण्यासाठी एक ते दीड लाख भाविक एकत्र आलेले असतात व रिंगण संपल्यानंतर बाहेर पडताना भाविकांची व वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असते. हे सर्वजण एकत्र बाहेर पडत असताना प्लेटच्या उड्डाणपूलामुळे कोणालाही रस्ता क्रॉस करता येणार नाही. त्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यापारी वर्गाचा प्लेटच्या उड्डाणपूलाला प्रचंड विरोध आहे. तरी प्लेटचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल करण्यात यावा असे पत्र दिलेले आहे.
सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आशा नागनाथ ओवाळ यांनी दिलेल्या पत्रामध्ये गावाचे दळणवळण, उद्योग, व्यवसायिक, शेतकरी, ऊस वाहतूक, शाळकरी विद्यार्थी यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. सदरच्या उड्डाणपूलामुळे सर्वांचे अतोनात हाल होणार आहेत. कारखाना, शाळा, पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस, सहकारी बँक महसूल ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाने हे रोडच्या दोन्ही बाजूला आहेत. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर कारखाना सीजनमध्ये ऊस वाहतूकीमुळे वाहतुकीची मोठी प्लेटच्या उड्डाणपुलामुळे अडचण येणार आहे. तर सदरचा कॉलमचा पुल काढण्यात यावा असे पत्र दिलेले आहे.
उड्डाणपूल संघर्ष समिती पुरंदावडे ग्रामपंचायत व सदाशिवनगर ग्रामपंचायत यांची मागणी रास्त आहे. भविष्यात होणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता वेळीच आवाज उठवून “आमचं ठरलं” आहे, असे समस्त ग्रामस्थ, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वपक्षीय नेते मंडळी या लढ्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे व वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणपूलामध्ये बदल करावा, अशी भावना समस्त संघर्ष समिती सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामस्थ यांची झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng