प्रेरणादायी बातमी : मल्लसम्राट व्यायाम शाळेच्या आठ मल्लांना सुवर्णपदक तर, एकाला रौप्य पदक, कुस्ती क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी…
गुरुवर्य स्वर्गीय मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांना गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिष्य ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांची आदर्श गुरूला शिष्याची भेट
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मल्लसम्राट व्यायाम शाळेतील मुल्लांनी कुस्ती मल्ल विद्या संकुल पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन केलेले होते. त्या स्पर्धेत सुवर्णपदक प्रज्योत बापूराव कोळेकर, ओम सर्जेराव वाघमोडे, संग्राम यशवंत माने, चैतन्य संदीप थोरात, विश्वजीत सुभाष मारकड, प्राण परशुराम भुजबळ, सत्यजित तानाजी जमदाडे, कु. श्रद्धा संतोष खरात अशा आठ मल्लांनी सुवर्णपदक तर रौप्य पदक प्रताप मधुकर काळे याने मिळविलेले असल्याने गुरुवर्य स्व. मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांना गुरुपौर्णिमेच्या पूर्व संध्येला शिष्य सर्जेराव उर्फ ॲड. आप्पासाहेब एकनाथ वाघमोडे यांची आदर्श गुरूला शिष्याने भेट दिलेली आहे, अशी कुस्ती क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस शहरात स्व. एकनाथ नारायण वाघमोडे व स्व. मारुती नारायण वाघमोडे यांनी कुस्ती क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला होता. त्यांचाच वसा आणि वारसा पै. हनुमंत मारुती वाघमोडे, पै. शिवाजी एकनाथ वाघमोडे, पै. माणिकबापू एकनाथ वाघमोडे व पै. ॲड. आप्पासाहेब एकनाथ वाघमोडे यांनी पैलवानकीचा वसा आणि वारसा जपलेला आहे.
लहानपणापासून पैलवानकीचे धडे घरामध्ये वडील, चुलते आणि थोरले बंधू यांच्याकडून आप्पासाहेबांना मिळालेले होते. आप्पासाहेबांनी कुस्तीबरोबर शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलेले होते. त्यांनी बारावी नंतर ग्रॅज्युएशनसाठी सांगली येथे शिक्षणास सुरुवात केलेली होती. त्या ठिकाणी शिक्षणाबरोबर भोसले व्यायाम शाळा सांगली येथे कुस्त्यांचा सराव स्व. गुरुवर्य मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी सुरू होती. आप्पासाहेबांनी सांगली येथे दहा ते बारा वर्ष भोसले व्यायाम शाळेत राहून ग्रॅज्युएशन व एलएलबी डिग्री पूर्ण केलेली होती.
ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांचे माळशिरस न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू आहे. त्यांनी वकिली क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल केलेले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाचे संकट संपूर्ण देशावर आलेले होते. अशा कठीण परिस्थितीत उद्योग व्यवसाय बंद पडलेले होते. जत्रा, यात्रा बंद असल्याने मैदानी कुस्ती बंद होती. यावेळी अनेक गोरगरीब व नवोदित मल्लांना ग्रामीण भागात कुस्ती जोपासण्याकरिता व्यायाम शाळेची गरज होती. हीच गरज ओळखून ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांनी स्वतःच्या घरासमोर व्यायाम शाळा सुरू केली. मोठा हाऊद बांधून त्यावर पत्र्याचे शेड उभा केलेले आहे. व्यायाम शाळेला गुरुवर्य स्व. विष्णुपंत सावर्डेकर यांना मल्ल सम्राट म्हणत होते. म्हणून मल्लसम्राट व्यायाम शाळा सुरू केलेली आहे.
कुस्ती खेळामध्ये नाविन्य असणारे आप्पासाहेब यांनी मुले घडवीत असताना स्वत: आखाड्यामध्ये उतरून मुलांना योग्य प्रशिक्षण व डाव टाकण्याची कला शिकवत असतात. दिवसेंदिवस मल्लसम्राट व्यायाम शाळेतील मल्ल कुस्ती क्षेत्रामध्ये जत्रा, यात्रा व विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक पदके मिळवू लागले आहेत. सध्या आठ मल्लांनी सुवर्णपदक व एका मल्लाने रोप्य पदक मिळवलेले आहे. नॅशनल स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशातील हरिहर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी नऊ मल्लांची निवड झालेली आहे. निश्चितपणे नॅशनल स्पर्धेमध्ये मल्ल यशस्वी होतील, असा विश्वास वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे म्हणाले कि, तालीम सुरू करीत असताना आपल्या घराण्याची परंपरा व समाजातील सर्वसामान्य व गरीब मुलांना योग्य प्रशिक्षण देऊन कुस्ती क्षेत्रामध्ये माळशिरस तालुक्याचे नाव कोरण्याचा मनोदय आहे. कुस्तीबरोबर मुलांनी शालेय शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी बनले पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. निश्चितपणे भविष्यात माळशिरस तालुक्यामधील कोणत्याही स्पर्धेमध्ये विद्यार्थी दैदिप्यमान यश मिळवतील. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व विविध केसरीसाठी तालुक्यातील मल्ल घडविण्यासाठी निस्वार्थीपणे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात कुस्ती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन करणाऱ्या मल्लाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे मतही, यावेळी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng