जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या लेकी अस्तित्वाच्या लढाईसाठी रणरागिनी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आल्या.
आंदोलन व मोर्चाच्या इतिहासात पहिल्यांदाच जैन समाजातील भगिनी रस्त्यावर काळे झेंडे घेऊन सहभागी झाल्या
भाजपचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची उदासीनता, काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींकडून अस्तित्वाच्या लढाईत सहकार्याची अपेक्षा
सदाशिवनगर ( बारामती झटका )
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर रस्त्याच्या महामार्ग विस्तारीकरणात सदाशिवनगर पुरंदावडे दरम्यान प्लेटचा उड्डाणपूलाचे काम सुरू झालेले आहे. प्लेटच्या उड्डाणपूलामुळे दोन्ही गावाचे अस्तित्व धोक्यात येऊन व्यापारी वर्गातील लोकांना स्थलांतरित झाल्याशिवाय गत्यंतर नाही, हे व्यापारी व ग्रामस्थांच्या लक्षात आले.

ग्रामस्थांचा उड्डाणपुलाला विरोध नाही मात्र, प्लेटऐवजी कॉलममध्ये उड्डाणपूल तयार करावा, या मागणीसाठी पुरंदावडे सदाशिवनगर गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी, ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचा रास्ता रोको संपन्न झाला. या रास्ता रोकोमध्ये जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या लेकी दोन्ही गावाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी रणरागिनी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आलेल्या होत्या. आजपर्यंतच्या आंदोलन व मोर्चाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जैन समाजातील भगिनी रस्त्यावर काळे झेंडे घेऊन रणरणत्या उन्हात सहभागी झालेल्या होत्या.
मात्र, केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे लोकप्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांचे गावाच्या अस्तित्वाच्या लढाईकडे उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींकडून अस्तित्वाच्या लढाईत सहकार्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

पुरंदावडे सदाशिवनगर गावातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. दोन्ही गावातील नेते, कार्यकर्ते, व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी एकीचे दर्शन दाखवलेले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.
लोकप्रतिनिधी यांच्या विषयी पुरंदावडे सदाशिवनगर गावामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटलेला आहे. भाजपने उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष केले तर, काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही गावातील जनतेला व व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, याच्या हालचाली राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गोटात सुरू झालेल्या आहेत.

पुरंदावडे सदाशिवनगर गावाच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोणता लोकप्रतिनिधी व कोणता पक्ष वाली ठरतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. नाहीतर दोन्ही गावातील नेते व कार्यकर्ते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याकरता शिष्ट मंडळाची तयारी सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
