विधवा महिलांना अनिष्ट प्रथांमधून मुक्त करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडचे निवेदन
धर्मपुरी (बारामती झटका)
ग्रामपंचायत धर्मपुरी येथे विधवा महिलांना अनिष्ट प्रथांमधून मुक्त करण्यासाठी ठराव करण्याबाबतचे निवेदन जिजाऊ ब्रिगेड, पंढरपूर विभाग यांच्याकडून देण्यात आले.
पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या स्त्रियांच्या बांगड्या फोडणे, कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडवे व इतर आभूषणे काढून घेणे अशा प्रकारच्या अनिष्ट चालीरीतींना आज आपल्या देशातील विधवा स्त्रियांना सामोरे जावे लागत आहे. एकविसाव्या शतकातील विधवा स्त्रियांना सामान्य स्त्रियांसारखी वागणूक न देता दुय्यम वागणूक दिली जाते. या जाचक प्रथांमुळे विधवा महिलांना सामाजिक कार्यक्रमात तसेच धार्मिक शुभकार्यात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. परंतु, या जाचक प्रथेमुळे या अधिकारावरती गदा येत आहे
काळानुरूप बदल करून हेरवड जि. कोल्हापूर ग्रामपंचायतीने विधवांच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध ठरावाद्वारे एक क्रांतिकारी निर्णय घेऊन देशामध्ये इतिहास रचला आहे. यासाठी सरकार दरबारी ही सकारात्मक भूमिका आहे. याच गावांचा आदर्श घेऊन आपणही अनिष्ट चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात ठराव सहमत करून एक आदर्श निर्माण करावा, असे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवमती मनीषा जाधव (जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग), सौ, सुनिता माने उपसरपंच ग्रामपंचायत धर्मपुरी, श्रीमती साळवे मॅडम ग्रामसेविका ग्रामपंचायत धर्मपुरी तसेच शिवमती अर्चना पाटील, शिवमती दिपाली शेंडगे, शिवमती निकिता शेंडगे, शिवमती उज्वला माने, पवार मॅडम, गायकवाड मॅडम, धायगुडे ताई आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

