हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत अकलूज येथील अंबाबाई रोड – २ अंगणवाडीत प्रभातफेरी काढून जनजागृती.
अकलूज ( बारामती झटका )
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे, ही या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हे महत्त्वाचे अभियान आहे.


नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात देखील हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तशा सूचना दिल्या आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने माळशिरस तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांना देखील सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माळशिरस तालुक्यातील एकात्मिक बालविकास अंतर्गत सर्व अंगणवाडीमध्ये दि. ३, ५ आणि ९ ऑगस्ट या तीन दिवशी अंगणवाडीमध्ये प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्प अधिकारी अरलवाड व माळीनगर बिट – २ च्या पर्यवेक्षिका रंजना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील अंबाबाई रोड – २ या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात ५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या उपक्रमा संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यात ३ ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी सहभाग घेऊन प्रभात फेरी काढली. ध्वज उभारू, घरोघरी, एकच नारा, हर घर उभारू तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या.
अंगणवाडी सेविका सौ. संध्या गणेश जाधव व मदतनीस कमल लोखंडे यांनी आपल्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातील पालकांच्या घरोघरी जाऊन आपल्या घरावर तिरंगा फडकविण्यासंदर्भात पालकांना प्रोत्साहित करून, त्यांना शासनाचे नियम सांगून मार्गदर्शन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng