श्रीपूर येथील सीमेवर जवानांना बारा वर्ष अखंडित राख्या पाठवणारे शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान
श्रीपूरच्या राख्या सीमेवरील जवानांकडे पोस्टामधून रवाना
सैनिक, 24 तास कर्तव्य बजावणारे पोलीस, आरोग्य सेवक यांच्याकडे पोस्टामधून राख्या पाठवण्यात आल्या.
श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर ता.माळशिरस येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी देशाच्या सीमेवरती रक्षण करीत असलेल्या सैनिकांना, पोलिसांना, जवानांना व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना श्रीपूर येथील पोस्टामधून राख्या पाठवल्या. गेली १२ वर्षापासून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान सैनिकांसाठी, पोलिसांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे.
देश रक्षण करत असताना या पोलिसांना, सैनिकांना कुटुंबांमध्ये एकत्रित सण साजरे करता येत नाहीत, म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे, सदस्य विजया नाईकनवरे, करुणा धाईंजे, कांचन देवडकर, सारिका मोहिते, रंजना अडसूळ या महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपूर पोस्टामधून नवी दिल्ली, गडचिरोली, हरियाणा, लेह लडाख, तळेगाव पुणे, भोपाळ, आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन या ठिकाणी राख्या पाठविल्या.
सीमेवरील जवान, पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून देश संरक्षण करीत असतात. सर्वजण कर्तव्य बजावताना अनेक सण, वार, उत्सव यांच्यापासून वंचित राहत असतात. त्यांना सेवेच्या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी करता यावी, म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने राख्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक शुभेच्छा पत्र देखील पाठवले आहे. आणि बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. श्रीपूर पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा उभा केलेली आहे. सुट्टीचे दिवस असताना सुद्धा राख्या कशा लवकर जातील, याचे देखील येथील पोस्टमास्तर बोगे, पी.जी दीक्षित, पांडुरंग भालेराव, ज्ञानेश्वर सावंत, संजय फुलबडवे, पोस्टमन बापू कचरे, विठ्ठल सुरवसे, शंकर रेडे, कृष्णा भाग्यवंत या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्था केली आहे. राख्या पाठविण्याची पोस्टामध्ये चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळे महिलाभगिनीमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng