अकलूज येथे गरोदर व बाळंतीण महिलांसाठी मोफत मार्गदर्शन, तपासणी व पौष्टिक आहाराचे वाटप
अकलूज (बारामती झटका)
इनरव्हील क्लब अकलूज, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, रोटरी क्लब अकलूज व इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे गरोदर व बाळंतीण महिलांसाठी तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन, त्यांची तपासणी व पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉटर्स मॉम्स फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. दीपक फडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे व उपजिल्हा रुग्णालय अकलूजचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. महेश गुडे व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैष्णवी शेटे यांनी करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. स्त्री रोग तज्ञ डॉ. मानसी देवडीकर यांनी उपस्थित महिलांनी बाळाला कशा पद्धतीमध्ये स्तनपान करावे, स्तनपानाचे फायदे-तोटे, महिलांच्या आरोग्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम, बाळाला आईचे दूध कसे महत्त्वाचे असते, यावर बाळाचे पूर्ण आरोग्य कसे निगडित असते, ते सांगितले. तर डॉ. सविता गुजर स्त्री रोग तज्ञ यांनी ज्या महिलांना डायबेटीस, क्षयरोग, उच्च रक्तदाब असे आजार असतील, त्या महिलांनी घ्यावयाची काळजी, त्या महिलांनी मुलांना स्तनपान करावे किंवा नाही करावे, हाय रिस्क प्रेग्नेंसी यावर मार्गदर्शन केले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, कारण महिलेचे आरोग्य नीट असेल तरच कुटुंबाचे आरोग्य नीट राहते. पण त्यातूनही गरोदर महिला व बाळंतीण महिला यांचा हा दुसरा जन्म असतो. यावेळेस फार काळजीपूर्वक आपण पूर्ण माहितीने सर्व गोष्टी करायला हव्यात, असे सांगितले. या शिबिरात 70 ते 80 गरोदर व बाळंतीण महिलांनी लाभ घेतला. यावेळी त्यांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांनी गरोदर महिलांनी मुलगा अगर मुलगी होऊ दे, निश्चितच तुम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा, असा संदेश आपल्या मार्गदर्शनातून दिला. त्यांनी डॉटर्स मॉम्स फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर चांगले काम केले असून त्यांच्या या कार्याची दखल देशपातळीवरील व राज्य पातळीवरील अनेक सामाजिक संघटनांनी घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या आयएसओ अमोलिका जामदार, स्वाती चंकेश्वरा यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैष्णवी शेटे यांनी केले तर आभार रोटरीन केतन बोरावके यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
