मांडवे गावातील बुजुर्ग व्यक्तिमत्व जयवंत तात्या पालवे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर…
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा
माळशिरस ( बारामती झटका )
मांडवे ता. माळशिरस येथील राजकारणातील बुजुर्ग व्यक्तीमत्व माजी सरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत मारुती पालवे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यातर्फे आंतरराज्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक व्यक्तींना पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा दि.8 ऑक्टोंबर 2022 रोजी आदर्श विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज वडगाव, पोलीस स्टेशन जवळ, बेळगाव येथे दुपारी अकरा वाजता सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, इंजीनियरिंग व डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्र, गोल्डन ज्वेलरी व सहकार इत्यादी क्षेत्रांमधील कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील व्यक्तींचा आंतरराज्य गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व केंद्रीय मंत्र्यांकडून अभिनंदन पत्र, मैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
सदर कार्यक्रमास अनेक जिल्ह्यांचे पोलीस प्रमुख, मंत्री महोदय, खासदार, आमदार, सैन्य दलाचे उच्च अधिकारी उपस्थित राहणार आहेत. असे पत्र असून त्यावर वीरप्पा मोईली मा. मुख्यमंत्री कर्नाटक व माजी केंद्रीय कायदामंत्री भारत सरकार लक्ष्मीकांत पार्सेकर, मा. मुख्यमंत्री गोवा श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार बेळगावचे मा. खासदार बॅरिस्टर अमरसिंह पंडित, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मांडवे गावातील शांताबाई व मारुती आबा पालवे यांचे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब. त्यांना धोंडीराम, जयवंत, हनुमंत व देवबा अशी चार मुले तर, राधाबाई शेंडगे मांडवे, कांताबाई वाघमोडे तामशीदवाडी, यशोदा शेंडगे रेडे, मंगल गोरे मांडवे अशा चार मुली आहेत. प्रतिकूल परिस्थितीमुळे धोंडीराम व जयवंत यांनी शेती व्यवसाय करून आई-वडिलांना सहकार्य केले तर हनुमंत व देवबा या लहान बंधूंनी शिक्षण घेऊन नोकरी केलेली आहे.
जयवंत मारुती पालवे यांचा जन्म दि. 1 जून 1955 साली झालेला आहे. लहानपणापासून संघटन कौशल्य व सामाजिक कार्याची आवड होती. शेती व्यवसायाबरोबर समाजकार्य सुरू होते.
1987 साली पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे राहिले. प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर जयवंत तात्या यांच्याकडे पहिल्याच निवडणुकीत सरपंच पदाची धुरा आली. सरपंच पद सलग सतरा वर्ष सांभाळले. आरक्षणामध्ये सरपंच पद अनुसूचित जातीकडे गेल्यानंतर पाच वर्ष उपसरपंच पदावर काम केलेले आहे. 2003 साली माळशिरस पंचायत समितीचे सदस्यपदी अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळालेली होती. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदर्श असणारी धर्मवीर सदाशिवराव माने बिगर शेती सहकारी पतसंस्था सदाशिवनगर या पतसंस्थेवर पंधरा वर्ष संचालक पदावर काम केलेले आहे.

जयवंततात्या यांनी प्रतिकूल परिस्थितीत मांडवे गावामध्ये अनेक विकास कामे करून गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. अनेक विकास योजना गावासाठी सक्षमपणे राबविलेल्या आहेत. समाजामध्ये जयवंत तात्या यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. उत्कृष्ट पद्धतीने शेती व्यवसाय व दोन बंधूंनी प्रामाणिकपणे नोकरी करून पालवे परिवार यांचे प्रपंच सुस्थितीत आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात जयवंत तात्या पालवे यांचा आदर्श असा परिवार आहे.
समाजामध्ये मान, प्रतिष्ठा कायम असते. जयवंत तात्या यांचा 1974 साली तामशीदवाडी येथील मारुती वाघमोडे यांची कन्या नागरबाई यांच्याशी विवाह झालेला आहे. त्यांना नानासो व राजेंद्र दोन मुले आहेत तर, संगीता बंडगर भिगवन अशी एक मुलगी आहे. नागरबाई यांनी सुद्धा समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. जयवंत तात्या यांना राजकीय, सामाजिक कार्यात नेहमी पाठबळ दिलेले आहे.

कोणाच्याही सुखदुःखामध्ये व सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. अडीअडचणीत असलेल्या लोकांना तात्यांची नेहमी मदत असते. तात्यांचा सुसंस्कृत स्वभाव व जनसामान्यांमध्ये असलेली प्रतिष्ठा यामुळे माळशिरस तालुक्यात नेहमीच जयवंत तात्या यांची भूमिका समाजहिताच्या बाजूने राहिलेली आहे.
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील राजकारणातील बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना आंतरराज्य कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा पुरस्कार मिळालेला असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात जयवंत तात्या पालवे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख होणार आहे. बुजुर्ग व्यक्तिमत्व जयवंत तात्या पालवे यांना आंतरराज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनिवास कदम पाटील, संपादक बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलच्या वतीने भावी कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng