शायनिंग महाराष्ट्र २०२२ महाप्रदर्शनाचा शानदार समारोप…
तीन दिवसांत प्रदर्शनाला दहा हजार नागरिकांची भेट…
शायनिंग महाराष्ट्रमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताचे दर्शन – ज्योती पाटील
वेळापुर (बारामती झटका)
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने येथील शिवशंभू मंगल कार्यालयात सुरु असलेल्या “शायनिंग महाराष्ट्र २०२२” चा शनिवारी शानदार समारोप करण्यात आला. हे प्रदर्शन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारताचे दर्शन देणारे असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती पाटील यांनी समारोप सोहळयात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना व्यक्त केले. यावेळी मंचावर माळसिरस पंचायत समितिचे माजी सदस्य के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा ओबीसी मोर्चाचे बाळासाहेब वावरे, सांसा फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद पाल व मनमोहन भास्कर यांची प्रमुख उपस्थिति होती.


गेल्या तीन दिवसांपासुन सुरु असलेल्या या प्रदर्शनाला वेळापुर परिसर आणि माळशिरस तालुक्यातील दहा हजार नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी भेट दिली. प्रदर्शनात मांडलेल्या वस्तुंना नागरिकांनी प्रतिसादही दिला. खादी ग्रामोद्योग, ओडिसा बांबू, मणिपाल बांबू आणि कृषि विभागाच्या स्टॉलमध्ये मांडलेल्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

या समारोप सोहळ्यामध्ये आरबीआय, जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, उत्तराखंड हेन्डलूम, झारखंड टुरिझम, अटोमिक एनर्जी, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड, एन.बी.सी.सी. इंडिया लिमिटेड, आयसीएमआर, नोटमो, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, उडीसा बांबू, खादी ग्रामोद्योग, क्वायर बोर्ड आदी पंचवीस स्टॉल धारकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बेस्ट स्टॉल अवार्ड देऊन गौरविण्यात आले. वेस्टर्न कोल्फिल्ड, क्रीपको, ग्राउंड वॉटर सर्व्हे या स्टॉल विभागांना गौरविण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे के. के. पाटील यांनी दिल्लीचे सांसा फाउंडेशन आणि खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती केल्याचे सांगुन वेळापुर परिसरात लवकरच कृषी प्रदर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब सरगर यांनी मनोगत व्यक्त केले. एन.बी.सी.सी.च्या अभियांत्रिकी कार्यकारी अधिकारी रेश्मा दुडानी यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून केंद्र सरकारच्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत ग्रामीण भागातील लोकांची उत्सुकता चकित करणारी असल्याचे मत व्यक्त केले.


प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी श्रीनिवास कदम पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आनंद पाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन देशमुख, दादा तुपे, संतोष बाबर, ओंकार आडत, सूर्यकांत मोहिते, दत्ता येडगे, अजिंक्य गोसावी, विनोद साठे, मंगेश मस्के आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng