आ. शिंदे बंधूच्या प्रयत्नांना यश, दुष्काळी गावांना मिळणार दिलासा

बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव (खे.) या गावांना सिना-माढा योजनेचे पाणी देण्यास शासनाची मंजूर
बेंबळे (बारामती झटका)
माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव (खे.) या कायम दुष्काळी गावांना सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी शासनाचे कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती आ. बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ. शिंदे म्हणाले की, माढा तालुक्यातील सिना-माढा उपसा सिंचन योजना ही माढा तालुक्यासाठी वरदायिनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत 13 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव (खे.) ही गावे कायम दुष्काळी पट्ट्यात येत आहेत. दरवर्षी पडणा-या पावसाच्या पाण्याशिवाय गावांना पाण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. या योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेल्या पाण्यातून लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता.


त्याबाबत शासनाने लाक्षक्षेत्राबाहेर मागणी केल्यास क्षेत्रास असणारी पाण्याची निकड इत्यादी बाबींवर विचार विनिमय/अभ्यास करुन नलिका वितरण प्रणाली धोरणात सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी दि.19/04/2023 रोजी शासन निर्णयान्वये समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला व त्यानुसार शासनाने शासन निर्णय काढला. बुधवार दि.26/06/2024 रोजी पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ व इतर संबंधित अधिकारी यांचेशी झालेल्या अंतिम बैठकीत वरील गावांना सिना-माढा योजनेचे पाणी देण्यास मंजूरी देण्यात आली.
सिना-माढा योजनेचे पाणी या गावांना मिळण्यासाठी आमदार शिंदे बंधुनी शासन स्तरावर संबंधित खात्याचे मंत्री महोदय, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी यांनी मुंबई व पुणे येथे मागील दोन वर्षामध्ये वारंवार मिटींगा लावुन पाठपुरावा केला आहे. तसेच या भागातील नागरिकांनी नागपूर अधिवेशनामध्ये या संदर्भात आंदोलन केले होते. त्यादरम्यान, आमदार संजय मामा शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सदर प्रश्न सोडवण्याबाबत शब्द दिला होता.


… फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या शासन निर्णयामुळे मार्ग झाला सुकर
सिना-माढा योजनेचे पाणी बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव (खे.) या गावांना मिळावे यासाठी बंद नलिकेद्वारे वितरण प्रणाली बाबत स्वतंत्र धोरण राबविणेसाठीचा शासन निर्णय होणेसाठी आ. बबनराव शिंदे व आ. संजयमामा शिंदे हे मागील चार वर्षापासून शासन दरबारी प्रयत्नशील होते. याबाबतचा शासन निर्णय दि.28 फेब्रुवारी, 2024 निघालेला असून या शासन निर्णयामुळे माढा तालुक्यातील वरील गावांचा या योजनेंतर्गत समावेश करणेत आलेला आहे. या दुष्काळी गावांना सिना-माढा योजनेचे पाणी मिळणार असल्याने या गावांचा पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तसेच या निर्णयामुळे तालुक्यातील बेंद ओढ्यात देखील पाणी सुटणार असून याचा देखील लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



