आरोग्य विभागाचा बोजवारा, किती जीव गेल्यानंतर आरोग्य विभाग जागे होणार !
108 क्रमांकाची रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने अनेक तरुण दगावल्याचा मनसेचा आरोप
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असून माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा या ठिकाणी रुग्णांसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहीका नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून अनेक रुग्ण यामुळे दगावत असल्याचा असा आरोप नगरसेविका रेष्मा सुरेश टेळे यांनी केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी त्वरित राजीनामा द्यावा, असे सांगून 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स माळशिरस ग्रामीण रुग्णालयात त्वरित उपलब्ध करून द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोठे आंदोलन उभा करण्यात येईल, असे निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना दिले आहे.
माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरातून आळंदी-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग व सातारा-लातूर हा महामार्ग जात आहे. या शहराची लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असून आसपासच्या दहा-पंधरा खेड्यातील नागरीक हे या तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरातून दोन महामार्ग गेल्यामुळे अपघाताची संख्याही जास्त आहे. परंतु, या ग्रामीण रुग्णालयात 108 नंबरची रुग्णसेवा उपलब्ध नाही. तसेच ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व अनेक आरोग्य सुविधा नसल्याने हे ग्रामीण रुग्णालय तालुक्याचे असूनसुद्धा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या दोन महामार्गावर अपघात झाल्यानंतर नागरिक 108 या रुग्णवाहिकेस फोन करतात. परंतु, याकडून कुठलाही प्रतिसाद नागरिकांना मिळत नाही व 108 ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून किती लोकांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
गेल्या महिनाभरापासून माळशिरस व परिसरात आठ ते दहा अपघात झालेले आहेत. काहीजण मृत्युमुखी पडले आहेत व काहीजण गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचा प्रत्यय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांना आला आहे. ते प्रवास करत असताना त्यांच्यासमोरच एका दुचाकीचा अपघात सातारा-लातुर महामार्गवर झाला. त्यांनी 108 रुग्णवाहिकेत फोन केला. परंतु, कसलाही प्रतिसाद यांना मिळाला नाही. त्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना त्यांनी फोन केला परंतु, त्यांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या चार चाकी गाडीतून त्या अपघातग्रस्त व्यक्तीला माळशिरस येथील रुग्णालयात दाखल केले. माळशिरसचा आरोग्य विभागही सलाईनवर असून तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एका दुचाकीचा अपघात सातारा-लातुर महामार्गवर झाला. त्यांनी 108 रुग्णवाहिकेला फोन केला परंतु ,कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना त्यांनी फोन केला परंतु, त्यांनीही फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या चार चाकी गाडीतून त्या अपघातग्रस्त व्यक्तीला माळशिरस येथील रुग्णालयात दाखल केले. विशेषत: आरोग्यमंत्री हे सोलापूर जिल्ह्यातील असून अशी अवस्था, मग राज्यात चित्र कसे असेल. माळशिरसचे माजी नगरसेवक यांचा रात्री अपघात झाला. त्यांनासुद्धा गाडी उपलब्ध झाली नाही. त्यांच्या मुत्यूला कोण जबाबदार आहे ? माळशिरसचा आरोग्य विभागही सलाईनवर असून तात्काळ सुधारणा करावी.
सौ. रेष्मा टेळे नगरसेविका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.