“आषाढी वारी”त हरवलेल्या 2380 व्यक्तींचा शोध, 176 गुन्हेगार ताब्यात 11 अटक :- पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी..

सोलापूर (बारामती झटका)
यंदाच्या आषाढी वारीत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली. १७६ गुन्हेगारांना ताब्यात घेतले तसेच ११ गुन्हेगारांना अटक केली. जवळपास २३८० हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्या व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या.
त्यासाठी मदत केंद्रे उपयुक्त ठरली. आषाढी वारीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पंढरपुरात शिवाजी चौक, गौतम विद्यालय, सावरकर चौक, सोलापूर चौक, डीव्हीपी मॉल, अर्बन बँक चौक, अंबाबाई ग्राउंड, ६५ एकर या ठिकाणी वारकरी मदत केंद्रे उभारली होती. त्यात ४५० विद्यार्थी व स्वयंसेवक सहभागी झाले होते. पोलिसांच्या मदतीने २३८० हरवलेली मंडळी शोधून त्यांच्या नातेवाईकांशी पुन्हा भेट घडवून देण्यात आली.

यंदाच्या वर्षी गर्दी व्यवस्थापन व बचाव पथकाला नाशिक येथील संस्थेमार्फत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्दी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये ७ पोलीस अधिकारी, ३२५ पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा समावेश होता. महाद्वार घाट, महाद्वार चौक, नामदेव पायरी, पश्चिम द्वार, चौफळा, नाथ चौक, दगडी पूल, ६५ एकर क्षेत्र परिसरातून या पथकाने १२० ते १३० बेशुद्ध वारकऱ्यांना गर्दीतून बाहेर काढून प्राथमिक उपचार व वैद्यकीय मदत पुरवण्यात मोलाचे सहकार्य केले. म्हणजे यंदा पहिल्यांदाच पश्चिम द्वार ते चौफळा मंदिर परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी एकेरी मार्ग राबविण्यात आला. यामुळे वाहतूक सुरळीतपणे पार पडली.
तसेच यंदाच्या या वारीत १५ ड्रोन वापरण्यात आले, त्यापैकी ६ एआय आधारित होते. ड्रोनने पालखी मार्ग, रिंगण कार्यक्रम, थांबे, मंदिर परिसर व ६५ एकर क्षेत्राचे निरीक्षण केले. ९ मिनी ड्रोन गर्दीचे विश्लेषण व त्वरित प्रतिसादासाठी वापरण्यात आले. एआय ड्रोनने वारकऱ्यांची गणती, पी सिस्टिम व पोलिसांना सूचना देण्याचे काम केले.
२ अँटी ड्रोन यंत्रणांनी ३२ बेकायदेशीर ड्रोन पकडले. एकादशी दिवशी २७२८ लाख वारकरी उपस्थित होते. वारीत वरिष्ठ अधिकारी १०, पोलीस निरीक्षक, फौजदार ३००, पोलीस कर्मचारी ३२०० पुरुष, ८०० महिला, होमगार्ड २५०० पुरुष, ३५० महिला यांचा बंदोबस्त होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर २२ व्हीव्हीआयपी यांनी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर पालखीसोबत ६० कमांडो (बाईकवर), संत तुकाराम पालखीसोबत २५ कमांडो, ८ सेक्टर पोलीस अधिकारी बंदोबस्तास होते. डीएसपी स्तरावरील अधिकारी महामार्गांवर लक्ष ठेवत होते. ७० डिजिटल, अनालॉग वायरलेस सेट, ५३४ वॉकी-टॉकी, १४ रिपीटर, ६० मेगाफोन, २ लाऊडस्पीकर, ५० ठिकाण वायफाय राऊटर नेटवर्क जाम टाळण्यासाठी, ५० टूजी हॉटलाईन मोबाईल वरिष्ठ अधिका-यांकरिता वापरण्यात आले. गुन्हे शोध प्रतिबंधची ४ माऊली पथके सिव्हिल पोशाखात होते. त्यांनी १७६ संशयितांना ताब्यात घेतले, ११ गुन्हेगारांना अटक, २ वॉन्टेड व्यक्ती पकडल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



