ताज्या बातम्यासामाजिक

ॲड. आशुतोष कुंभकोणी यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव दिल्याने पुरस्काराची उंची वाढली – ना. चंद्रकातदादा पाटील

सातारा (बारामती झटका)

‘रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोठ्या कष्टाने उभी केली. ज्या काळात बहुजन समाजाला शिक्षण मिळत नव्हते त्या काळात कर्मवीरांनी शिक्षणाचा प्रसार केला. १९१९ ते १९३६ या काळात त्यांनी ६०० शाळा काढल्या. ही संख्या आज सर्व प्रकारची सुविधा अनुकुलता असताना अशक्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सहकारी यांनी आदर्श उभा केला. स्वतःचा संसार व वकिली सांभाळून इस्माईलसाहेब मुल्ला यांनी एक रुपया मानधन न घेता वर्षोनुवर्षे काम केले. त्याच तोलामोलाच्या आशुतोष कुंभकोणी यांना आज रयत शिक्षण संस्थेतर्फे पैगंबर इस्माईलसाहेब मुल्ला गौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. ज्यांना आपण नमस्कार करायला पाहिजे त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. अॅड. आशुतोष कुंभकोणी यांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली’ असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे मानदसचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त २०२३ चा इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार – २०२३ प्रदान कार्यक्रमात ते रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या कॉलेजच्या सभागृहात बोलत होते. मा. चंद्रकातदादा पाटील यांच्या शुभहस्ते यावेळी माजी अॅडव्हाकेट जनरल ऑफ महाराष्ट्र अॅड. आशुतोष कुंभकोणी यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. सौ. अनुजा आशुतोष कुंभकोणी यांना साडी, शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. रुपये एक लाख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे एक लाख रुपयामध्ये कष्टाचे ४ लाख रुपये घालून पाच लाखाची देणगी कुंभकोणी यांनी रयत शिक्षण संस्थेस देत असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील होते. यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कायदा सल्लागार अॅड. दिलावरसाहेब मुल्ला, संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, श्री. बी. एन. पवार, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. मोहन पाटील, डॉ. रोहन पाटील, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध शाखांचे प्रमुख व कर्मवीर कुटुंबीय, मासिक जडणघडणचे संपादक सागर देशपांडे, इस्माईलसाहेब मुल्ला यांचे कुटुंबीय व रयतसेवक उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्था मोठी होऊनसुद्धा तिची शकले झाली नाहीत, ती एकसंध राहिली. एकसंधतेचे कल्चर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तयार केले. सर्वसामान्य मुलांसाठी त्यांनी कमवा आणि शिका योजना सुरु केली. त्यातून शिक्षणासाठी पैसे मिळाले आणि शिक्षणही मिळाले. बाळासाहेब देसाई यांनी फुकट शिक्षण देण्यासाठी योजना जाहीर केली तेव्हा कर्मवीरांनी फुकट शिक्षण देऊ नये असे सांगितले. स्वाभिमान शिकवण्याचे कल्चर कर्मवीरांनी संस्थेत उभे केले. ४ लाख ५२ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. खूप मोठा व्याप संस्थेचा आहे. मी गिरणी कामगाराचा मुलगा. आमचे वडील कर्मवीर यांचे शिष्यच होते. त्यामुळे आम्हीही कमावण्याचे काम केले. मी १४ ते १९ काळात मंत्री झाल्यानंतर सायन ते इंदापूर हा टोल बंद करण्यात कुंभकोणीचे मार्गदर्शन मिळाले. मराठा आरक्षणाची केस हायकोर्टात जिंकलो, त्याचे श्रेय कुंभकोणीचे आहे. असे म्हणत घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजतात, त्याप्रमाणे कोणत्याही फीची अपेक्षा न करता त्यांनी काम केले, असे सांगत त्यांनी आशुतोष कुंभकोणी यांचेबद्दल गौरवोद्गार काढले. इस्माईलमुल्ला जीवनगौरव पुरस्कार अनपेक्षितपणे मिळाला त्याबद्दल आशुतोष कुंभकोणी यांनी रयत शिक्षण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या वकिली व्यवसाय व कार्याबद्दल बोलताना आशुतोष कुंभकोणी म्हणाले, वकिली व्यवसायाचा आणि शिक्षणक्षेत्राचा जवळचा सबंध आहे. आम्हाला वकिली क्षेत्रात दररोज पब्लिक परीक्षा द्यावी लागते. दररोज गृहपाठ करावा लागतो. मी दररोज पहाटे ५,३० वाजता उठतो. सकाळच्या दीड तासात अभ्यास करून अपलोड करतो आणि दिवसभर डाऊनलोड करतो. अलीकडे पार्लमेंटने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता, भारतीय साक्ष नियम हे तीन नवीन कायदे पारित केल्याने आम्हास पुन्हा अभ्यास करावा लागतो. न्यायाधीशांनी व वकिलांनी दररोज अभ्यास करणे आवश्यक असते. रयत शिक्षण संस्था ही शिक्षणक्षेत्रातली एकमेकाद्वितीय संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेचे सुरवातीचे बजेट ३० रुपये होते, आज १३०० कोटी झाले आहे. स्वावलंबन, स्वाध्याय, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान ही चतुःसूत्री रयतची आहे. सधन कुटुंबात जन्म न झालेले असे अनेक वकील आहेत. मी मराठी माध्यमात शिकलो. आमचे घराणे वकिली व्यवसायात असल्याने मी नवीन वकील झालो तेव्हा माझी तुलना घरातील आजोबा वडिलांशी लगेच करण्यात येत असे. अनेक दिग्गज वकिलांची मुले या व्यवसायात फेल गेली आहेत. कारकुनाचे काम करणारा माणूस सरन्यायाधीश होऊ शकतो, फक्त प्रामाणिकपणाची, कष्टाची गरज आहे. वळसे पाटील कायद्याचे अभ्यासक असल्याने त्यांच्याकडून मला विचार मंथन करीत फायदा झाला आहे. मला अनेक प्रकरणात युक्तिवाद करण्याची संधी दिली. चंद्रकात पाटील यांचा माझा सहवास १० वर्षाचा आहे. कायद्याची त्यांना जाण आहे. तळागाळातून ते इथपर्यंत पोचले आहेत. चंद्रकात दळवी कोणतीही गोष्ट मनापासून करतात. माझी पत्नी अनुजा हिने माझा सर्व संसार सांभाळला. आमच्या दोन्ही मुलींना आम्ही मराठी माध्यमातून शिक्षण दिले. आम्ही दोन्ही मुलींना नकार पचवायला स्वीकारले आहे. आपण दिलेला पुरस्कार व सत्कार गुणांचा सत्कार आहे. मला दिग्विजय खानविलकर, विलासराव देशमुख, शरद पवार साहेब, जयंत पाटील, अजित दादा यांनी अनेक प्रकरणे मला दिली. अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. महाअधिवक्ता म्हणजे राज्याचा सर्वोच्च वकील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने सन्मानाने वेळीच उतरावे त्याप्रमाणेच मी उच्च पदावरून खाली आलो असे म्हणत त्यांनी आपली नम्रता प्रकट केली.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शिक्षणाच्या प्रवासात अण्णांना अनेक जोडीदार मिळाले त्यात इस्माईलसाहेब मुल्ला हे एक होते. कुंभकोणी यांची योग्य निवड संस्थेने केली. संस्थेचे प्रश्न आणि प्रगतीसाठी चंद्रकातदादा पाटील यांनी सहकार्य केले. राज्याच्या मंत्रीमंडळात मनापासून काम करणारा मंत्री असा उल्लेख त्यांनी चंदकांतदादा पाटील यांचा केला. माझ्या काळात महाराष्ट्रात मेडिकलची प्रवेश प्रक्रिया हा मोठा प्रश्न होता. त्यावेळी मला कुंभकोणी यांची मदत झाली. एनरॉन कंपनी बुडाली तेव्हा लंडनच्या कोर्टात केस चालू असताना देखील त्यांच्याबरोबर चर्चा केली. कुंभकोणी यांनी हायकोर्टात जजपदाचा राजीनामा देऊन आत्मसन्मान जपला असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या स्वाभिमानाचे कौतुक केले.

चेअरमन चंद्रकात दळवी म्हणाले की, सर्वांनी कुंभकोणी यांच्या निवडीला पसंती दिली. १७ डिसेंबरला आम्ही कब्रस्तानात जाऊन इस्माईलसाहेब यांच्या कबरीवर पुष्पचक्र अर्पण केले. कुंभकोणी यांचे वडील व आजोबा हे नामांकित वकील होते. न्यायमूर्ती अजित शहा यांनी कुंभकोणी यांचे काम पाहून मुंबई हायकोर्टात त्यांना नेमले. कुंभकोणी साहेबांचे न्यायालयातील युक्तिवाद अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले. काहीही पगार न घेता काम करणारे इस्माईलसाहेब रयतमधील उच्चरत्न होते असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. तसेच चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सन्मानचिन्ह देऊन चंद्रकातदादा पाटील व दिलीप वळसे पाटील व आशुतोष कुंभकोणी यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. दीपा पाटील यांनी अनुजा कुंभकोणी यांचे स्वागत केले. जीवन गौरव पुरस्कारानिमित्त अॅड. दिलावरसाहेब मुल्ला यांनी मनोगत व्यक्त करून इस्माईलसाहेब यांचे चरित्र व रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या स्मृती कशा जतन केल्या ते सांगितले. यावेळी मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी आभार मानले. प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीत झाल्यानतर कार्यक्रमाची सांगता झाली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button