अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधुन घेतले
सांगोला (बारामती झटका)
विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातुन निवडुन आलेले लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख हे निवडुन आलेबरोबर एका महिन्याच्या आतच नागपुर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडले. गेले कित्येक वर्षे स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी अकरा वेळा आमदार असताना कित्येक अधिवेशनात सहभाग नोंदवला व जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधुन ते प्रश्न सोडवण्यास सरकारला भाग पाडले होते. त्याच कामकाजाची पद्धत नागपुर येथील पावसाळी अधिवेशनामध्ये नुतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने पहावयास मिळाली. पहिल्याच अधिवेशनामध्ये आपल्या मतदार संघातील व राज्यातील प्रश्न उपस्थीत करण्याची परवानगी मागितली व अध्यक्ष महोदयांनी वेगवेगळ्या विषयांवर ६ वेळा बोलण्याची संधी दिली व त्या संधीचा पुरेपुर फायदा आमदारसाहेबांनी घेत सांगोला मतदार संघातील व राज्यातील मांडलेले प्रश्न पाहता संपुर्ण महाराष्ट्राला पुन्हा आबासाहेबांच्या कामकाजाची पध्दती सभागृहामध्ये पहावयास मिळाली…
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहामध्ये प्रथमच बोलताना महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभे करण्याच्या कामाला कधी सुरवात होणार ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अकरा वेळा आमदार म्हणुन जनतेची सेवा केलेले स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचा सभागृहाच्या आवारात पुतळा उभा करण्याचा निर्णय या अगोदरच झालेला आहे. तो पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात केंव्हा होणार ? लोणारी, होलार व रामोशी समाजासाठी आर्थीक विकास महामंडळाची स्थापना झाली असुन त्या महामंडळास अर्थीक मदत केंव्हा देणार ? स्व. आबासाहेबांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेले ट्रॉमा सेंटर केंव्हा सुरु होणार ?, तसेच आरोग्य विभागातील अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तरी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करुन रुग्णांची सोय करावी..
अधिवेशनाच्या दुसऱ्या वेळेस आमदार बाबासाहेब देशमुख यांनी थकीत चारा छावण्यांची बिले छावणी चालकास त्वरीत देण्याची मागणी केली. तसेच तेल्या रोगाने उध्वस्त झालेल्या बागांचे पुनर लागवड करण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर करावे. तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्याने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाला आहे. अशावेळी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४०/- रुपये दर देण्यात यावा व दुधाला जे अनुदान मिळत आहे ते प्राप्त होण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत त्या अटी शिथील कराव्यात. तसेच वस्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना लादलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. स्व आबासाहेबांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेले सांगोला शहरात ट्रॉमा सेंटर उभारले असुन त्याचे लोकार्पण ताबडतोब करावे. आरोग्य विभागातील कर्मचारी संख्या ताबडतोब वाढवावी. अशा प्रश्नांना सभागृहात वाचा फोडली.
अधिवेशनात तिसऱ्या वेळेस बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी माण, बेलवण, कोरडा, अपृका या नदीपात्रातील बेकायदेशीर वाळु उत्खनन ताबडतोब बंद करावे व बांधकामासाठी लागणारी वाळु सरकारी नियमाप्रमाणे नागरीकांना मिळावी तसेच सांगोला मतदार संघातील बेकायदेशीर व्यवसायावर आळा घालावा कारण अवैध वाळु व बेकायदेशीर व्यवसाय यामुळे गुंडगीरी फोफावते आहे. तसेच सांगोला मतदार संघामध्ये सरकारी बस वाहतुक अगदी कमी प्रमाणात असुन नागरीकांचे व विशेषत: शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी सरकारी बस सेवा योग्य त्या प्रमाणात ताबडतोब सुरु करावी. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी चौथ्या वेळेस सांगोला तालुक्यातील अकोला व कोळा प्राथमीक आरोग्य केंद्राच्या इमारती अत्यंत नादुरुस्त झाल्या आहेत. या इमारती पावसाळ्यामध्ये गळतात त्यामुळे तेथील कर्मचारी व रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, तरी या ईमारतीसाठी ताबडतोब निधी मिळावा ही मागणी केली. २०१९ पुर्वी स्व. गणपतराजी देशमुख यांच्या प्रयत्नाने सांगोला शहरात ट्रॉमा सेंटरला परवानगी मिळाली व आज त्यांची इमारत पुर्ण झालेली आहे. डॉक्टर व कर्मचारी नसल्याने हे ट्रॉमा सेंटर बंद अवस्थेत आहे. तरी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची नेमणुक करुन त्याचे लोकार्पण करावे.
मेडशिंगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन वेळा उद्घाटन होवून सुद्धा कर्मचारी व डॉक्टरांवीना ते आरोग्य केंद्र बंद आहे. तशीच अवस्था खिलारवाडी, बंडगरवाडी व हलदहिवडी येथील प्राथमीक आरोग्य केंद्राची आहे. या ठिकाणी झाडे उगवली आहेत तरी ही प्राथमिक आरोग्य केंद्रे ताबडतोब सुरु करावीत व रुग्णांना दिलासा द्यावा. राज्यात ७१ हजार आशा वर्कर आहेत. त्याच बरोबरीने ३६०० गट प्रवर्तक आहेत. यांनी कोरोना काळात अगदी चांगल्या प्रकारे काम केले आहे. हे सर्वांना मान्यही असेल. मात्र हे सर्वजण कंत्राटी बेसवर काम करीत आहेत, त्यांना राज्य सरकारने कायम करावे व दिलासा द्यावा. सांगोला नगरपरीषद ही ‘क’ वर्गात मोडणारी नगरपरीषद आहे. इथे भुमिगत गटारांची कामे चालु आहेत ती कामे उत्तम दर्जाची व्हावीत व गटारीची कामे करताना खोदलेले आंतर्गत रस्ते दुरुस्त करुन द्यावेत. सांगोला नगरपरीषदेच्या नविन इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांचे काम ज्या ठेकेदाराला मिळाले आहे त्यांने हे काम आजुन सुरु केले नाही ते काम त्वरीत सुरु करावे,
अधिवेशनाच्या पाचव्या वेळेस बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्यातील महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. राज्यात सध्या जे हिंद केसरी पैलवान व महाराष्ट्र केसरी पैलवान यांना ६००० ते १३००० रुपये मानधन सरकारने जाहीर केले आहे ते मानधन एप्रिल महिन्यापासुन मिळालेले नाही. असे मानधन न मिळालेले ७ हिंद केसरी व २० महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. तरी यांचे मानधन ताबडतोब मिळावे आशी मागणी आमदार साहेबांनी केली.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सहाव्यांदा आमदारसाहेबांनी प्रश्न मांडले. आठवडा अंतीम प्रस्तावावर बोलताना त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन मेडीकल कॉलेज सुरु केले असुन त्या मेडीकल कॉलेजमध्ये प्रत्येक विभागाला डॉक्टर नाहीत. जे डॉक्टर असतात ते डेपोटीशनवरती पाठवले जातात. तरी सरकारने या मेडीकल कॉलेजसाठी डॉक्टरांच्या नेमणुका कराव्यात. सांगोला शहरात ग्रामीण रुग्णालय असुन या ठिकाणी एका वर्षात ७२ सिझरींग झाल्या आहेत तर खाजगी दवाखान्यात ७८९ सिझरींग झाल्या आहेत याचे कारण सरकारी रुग्णालयात अपुऱ्या डॉक्टराची संख्या व अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे नागरीकांना अर्थीक नुकसान तर होतेच आहे.. व रुग्णांची गैरसोय होत आहे. आदिवासी भागात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करावयाचे असेल तर डॉक्टर अभय बंगानी यांनी जी ८ ची स्टॅटेजी दिली आहे ती अंमलात आणावी व माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी करावे.
आपण २८८ सदस्य सभागृहात असुन आपण तीन ते चार लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. अशा वेळी सुरक्षीतता म्हणुन लॉबी मध्ये फस्टेडचे बॉक्स असावेत. व सरकारने काही महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी फस्टेडचे बॉक्स बसवावेत.
सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहे. त्यासाठी सांगोला शहरातील बस स्टॅन्डवरती शालेय शिक्षणासाठी तरुण मुली ये-जा करीत असतात. काही महीला खाजगी कामासाठी ये-जा करीत असतात, त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन बस स्टॅन्डवरती कायम स्वरुपी सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा नेमण्यात यावी. तसेच महिलांना व शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांना वेळेत घरी जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात यावी. मतदार संघातील मुला-मुलींच्या हाताला काम मिळावे यासाठी सांगोल्यामध्ये जी एम.आय.डी.सी. आहे, त्या एम.आय.डी.सी. मध्ये मोठ-मोठे उद्योग सरकारने आणावेत.
सांगोला हा दुष्काळी तालुका असुन या तालुक्यात अवकाळी पावसाने डाळींब, द्राक्ष, मका व ईतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामेसुध्दा झालेत. परंतु, अजुन त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ती ताबडतोब मिळावी.
महाराष्ट्रातील मेडीकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. करणारे पोस्ट ग्रॅज्युएट करणारे विद्यार्थी यांना पासआउट करताना जो बॉन्ड कंपलसेन केलेला आहे तो बॉन्ड ब्रेक करताना मिळालेला सरकारी निधी हा हेल्थ केअर साठीच वापरावा. अशा प्रकारचे २६ प्रश्न आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विचारुन संपुर्ण सभागृहाचे लक्ष वेधुन घेतल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.