अज्ञात व्यक्तीने केळीचे घड कापून शेतकऱ्यांचे केले सहा लाखाचे नुकसान…

दुसऱ्याच्या शेतात बटईने कर्ज काढून केले होते केळीचे पीक
माढा (बारामती झटका)
परिते ता. माढा, येथील भूमिहीन शेतमजूर असणाऱ्या नितीन माळी याने बेंबळे हद्दीतील इस्माईल सय्यद यांचे शेत बटईने केले. सध्या केळीला चांगला भाव असल्याने एक वर्षांपूर्वी केळीची लागवड केली. व्याजाने पैसे काढून केळीची रोपे, खते हा सर्व खर्च केला. मेहनतीने व नियोजनपूर्वक केळीची बाग उत्तम रीतीने उभा राहिली.
केळीची बाग हार्वेस्टिंगला आली असता व्यापारी लोकांची वर्दळ वाढली. सहा सात टन केळी पंचवीस रुपये किलो भावाने विकली. राहिलेल्या मालाचाही भाव पंचवीस रुपये किलोने ठरला होता.
दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा गावामध्ये होती. त्यामुळे शेतातील सर्व कामे आटोपून संध्याकाळी सहा वाजता सर्व माळी कुटुंबीय घरी गावात आले. तेव्हा अज्ञात व्यक्तीने बागेतील केळीचे घड अर्धवट कापून संपूर्ण बागेचे नुकसान केले. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन माळी शेतात गेले असता आपल्या केळीचे झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना परिस्थिती दाखवली. अंदाजे सहा ते सात लाख नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास असा अज्ञात व्यक्तींच्या दशकृत्याने हातचा गेल्याने माळी कुटुंबे पुरते घाबरून गेले आहे.
सदर घटनेची फिर्याद नितीन माळा यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या टीमने नुकसान झालेल्या बागेची पाहणी करून पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
शेळ्या चोरीच्या प्रमाणात वाढ…. पोलिसांचे सहकार्य नाही
परीते परिसरातील शेळ्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू असताना वारंवार तक्रार करूनही कोणत्याही चोरीचा तपास अद्याप पोलीस स्टेशनकडून लागलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अशा नुकसानीचा तपास पोलिसांनी करावा व शेतकऱ्याला सहाय्य करावे, अशी चर्चा परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.