उजनी आज मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येणार…

बंडगार्डन पुणे येथून १ लाख २ हजार ६६८ क्युसेक्स चा विसर्ग
दौंड (बारामती झटका)
२५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता दौंड येथून उजनी जलाशयात ८० हजार ८७८ क्यूसेक्स विसर्जाने पाणी येत असून यामध्ये रात्री वाढ झाली आहे. सध्या धरणात वजा -१०.२७% पाणीसाठा असून शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ रोजी सायंकाळपर्यंत धरण – मायनस अर्थात मृतसाठा मधून + प्लस अर्थात जिवंत पाणीसाठामध्ये निश्चित येईल, असे धरण नियंत्रण विभागाकडून ठामपणे सांगण्यात येत आहे.
२०२३ च्या पावसाळ्यात कमी पाऊस झालेला असल्यामुळे १५ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणात ६०.६० टक्के पाणीसाठा तयार झालेला होता. त्यामधून खरीप हंगामात दोन व उन्हाळी हंगामात एक आवर्तन शेतीसाठी सोडण्यात आले होते व नंतर पाणी पातळी कमी झाल्यामुळे १६ मे २०२४ पासून शेतीसाठी पाणी बंद झाले होते, त्यामुळे उजनीच्या लाभक्षेत्रातील लाखो एकर क्षेत्रातील कोट्यावधी रुपयांची पिके जळून अतोनात नुकसान झाले. उजनी जलाशयातून (बॅक वॉटर) होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे ४ जुलै २०२४ रोजी उजनी जलाशयात (वजा) – ६०.०१% पर्यंत धरणाच्या मागील ४३ वर्षांतील नीचांकी पाणी पातळी होती.
४, ५ व ६ जुलै २०१४ रोजी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे उजनीत पाणी येण्यास सुरुवात झाली व पाण्याची वाटचाल – मायनस कडून + प्लस कडे सुरू झाली. आज २६ जुलै रोजी सायंकाळी धरणातील पाणी पातळी मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यास प्रारंभ होत आहे. धरणात एकूण १११.२१% पाणी आल्यानंतर १२३.२३ टीएमसी पाणीसाठा होतो व धरण पूर्ण क्षमतेने भरले अशी नोंद केली जाते व ही सर्व क्रिया प्रत्येक वर्षाच्या १५ ऑक्टोबर पर्यंत म्हणजे पावसाळा अखेर नोंदली जाते. यामध्ये ६३ टीएमसी पाणी मृतसाठा व ६० टीएमसी पाणी जिवंत साठा असे मोजमा केलेले असते.

जुलै महिन्याच्या १५ तारखेपासून पुणे जिल्हा मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर तसेच लोणावळा पश्चिम बाजूस चांगल्या दमदार प्रकारे पाऊस सुरू झाला असून १९ जुलैपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे व २१ ते २४ जुलै पर्यंत या भागात १६२ मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. याचा परिणाम म्हणजे उजनीच्या वरील १९ पैकी नऊ धरणे १०० टक्के भरली आहेत, पाच धरणे ८०% च्या पुढे आहेत तर पाच धरणात ६० ते ६५ टक्के पाणीसाठा झालेला आहे. यापैकी खडकवासला, कळमोडी, कासारसाही, पवना, आंध्रा व इतर सहा धरणातून १०० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे हजारो क्युसेक्स विसर्गाने पाणी खाली सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांना पूर आला असून बंडगार्डन पुणे येथून १ लाख २ हजार ६६८ क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व परिस्थितीमुळे दौंड येथून भीमा नदीत ८० हजार ८७८ क्युसेक्स विसर्गाने पाणी उजनी जलाशयात येत आहे. विशेष बाब म्हणजे या विसर्गामध्ये रात्री वाढ होणार असून २६ जुलै २०२४ रोजी सायंकाळपर्यंत १ लाख ७० हजार क्यूसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढेल व धरण मृत साठ्यातून (मायनस मधून) जिवंत साठ्यात (प्लस मध्ये) निश्चित येणार, असे उजनी धरण नियंत्रण विभागाचे अभियंता प्रशांत माने यांनी कळवले आहे.
गुरुवार दि. २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताची उजनीची स्थिती
पाणीपातळी – ४९० २१० मीटर
एकूण साठा १६६७.०१ दशलक्ष घनमीटर, ५८.१६ टीएमसी
उपयुक्त साठा वजा – ११५.८० दशलक्ष घनमीटर, वजा -०५.५० टीएमसी टक्केवारी वजा १०.२७% टक्के
दौंड येथून विसर्ग ८० हजार ८७८ क्यूसेक्स
बंडगार्डन पुणे विसर्ग १ लाख २ हजार ६६८ क्युसेक्स.
वीर धरणातून नीरा नदीत ५५ हजार ६६४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग…
नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी व वीर धरणातील पाणी पातळीत वाढ होत असून सर्व धरणात ८५ ते ९५ टक्के पाणीसाठा झालेला आहे. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर मधून ५५ हजार ६६४ क्युसेक्स विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती निरा खोरेचे सहाय्यक अभियंता जयंत भांडवलकर यांनी दिलेली आहे. हे पाणी माळशिरस तालुक्यातून श्री क्षेत्र नरसिंहपूर येथे निरा भिमा संगमापासून पुढे भीमा नदीत येते, त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत भीमा नदीत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.