कोंडवावी येथील गट नंबर 81/1/1 या गटातील पाझर तलावात झालेले अतिक्रमण काढावे – सर्जेराव रेडेकर.

माळशिरस (बारामती झटका)
कोंडबावी ता. माळशिरस, येथील शेतकरी श्री. सर्जेराव बलभीम रेडेकर यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ९ सप्टेंबर २०२४ रोजी आमरण उपोषण करण्याबाबत इशारा दिलेला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार माळशिरस यांच्याकडे तक्रारी अर्ज वर्ग केलेला आहे. तहसील कार्यालय माळशिरस यांनी पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे वर्ग केलेला आहे. अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने पीडित शेतकरी तहसील कार्यालय व पंचायत समिती माळशिरस येथे हेलपाटे मारत आहेत.
श्री. सर्जेराव बलभीम रेडेकर (वय ६२) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये मौजे कोंढवा, ता. माळशिरस, येथील रहिवासी असून आमच्या मालकीचे गट नंबर 81/1/1 क्षेत्र 2.55 पोट ख. 1.26 आकार 2.40 असे क्षेत्र होते. या गटातील त्यापैकी पाझर तलावासाठी 2.14 भूसंपादित झालेली आहे. संपादित करताना तो गट माझ्याकडे होता. तेथील संपूर्ण क्षेत्र हे संपादित झाल्यामुळे मी त्याच्यालगत क्षेत्र घेतलेले नाही. भूसंपादन झालेल्या क्षेत्रापैकी गावातील गावगुंड व राजकारणी लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून मला वहिवाटीस अडथळा आणून दमदाटी करीत आहेत.
तरी शासनाने ते अतिक्रमण काढून ताब्यात घ्यावे किंवा मला म्हणजे मूळ मालक सर्जेराव बलभीम रेडेकर यांना मिळावे. त्यातील एक हेक्टर 20 आर पाझरपड इतर लोकांनी विहिरी पाडून अतिक्रमण करून त्यावरती गावातील गावगुंड व राजकीय पुढारी यांनी अतिक्रमण केलेले आहे व जाणीवपूर्वक अडथळा आणून मला त्रास देत आहेत. त्यामुळे माझे संतुलन बिघडून वादविवादाला तोंड फुटले आहे. तरी अतिक्रमण केलेल्या लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी उपोषणास बसणार आहे.
तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा अर्ज देऊन अर्जासोबत सातबारा, उपविभागीय जलसंधारण, जिल्हा परिषद, लपा उपविभाग माळशिरस यांचे दि. 29/07/2024 चे पत्र उपविभागीय अभियंता लघुपाटबंधारे विभाग अकलूज यांचे दि. 08/08/2024 चे पत्र जोडून सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी सोलापूर पाटबंधारे विभागीय आयुक्त पुणे, प्रांताधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस, गटविकास अधिकारी माळशिरस, सर्कल अकलूज, तलाठी अकलूज, ग्रामपंचायत कोंडबावी यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी श्री. सर्जेराव रेडेकर यांच्या अर्जावर शेरा मारून तहसीलदार माळशिरस यांच्याकडे अर्ज वर्ग केलेला आहे. तहसील कार्यालय माळशिरस यांनी पंचायत समितीकडे वर्ग केलेला आहे. पुढील कारवाई लवकर व्हावी अशी तक्रारदार श्री. सर्जेराव रेडेकर यांची भूमिका आहे. अन्यथा दुसरा पर्याय अवलंब करावा लागेल असा निराशाजनक इशारा बोलण्यातून देण्यात आलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.