अकलूज संग्रामनगरच्या तरुणाला कमेंट्स करणे पडले महागात, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..

अकलूज (बारामती झटका)
साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर ‘काय होतास तू, काय झालास तू’ या लिहिलेल्या संपादकीयवर रोहन पवार याने कमेंट करुन गौतम भंडारे यांचा सोशल मीडियावर सार्वजनिक ठिकाणी खालच्या दर्जाचे ठरवून अवमान केल्याप्रकरणी त्याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अन्वये कलम 3(1)(r) व कलम 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या 14 वर्षांपासून समाजामध्ये घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून संपादक गौतम भंडारे साप्ताहिक बंडखोरमधून समाजातील वाईट प्रवृत्तींवर आघात करीत असतात. तसेच त्यांनी बंडखोरच्या माध्यमातून अनेक घोटाळे समाजासमोर आणत जनजागृतीचे काम केले आहे. गौतम भंडारे हे जातीने हिंदु महार असून तालुकाभर त्यांच्या ओळखी असल्याने तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वाचकांना देखील गौतम भंडारे यांच्या जातीची माहिती आहे. त्याचप्रमाणे रोहन पवार रा. संग्रामनगर, ता. माळशिरस या हिंदु मराठा जातीच्या व्यक्तीलाही गौतम भंडारे हिंदु महार आहेत हे माहिती आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची सध्याची राजकीय कोंडी व वर्तमान परिस्थिती पाहून साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी दि. 08/02/2025 रोजी दुपारी 3 वा. चे सुमारास ‘काय होतास तू, काय झालास तू’ यावर संपादकीय प्रकाशित ते संपादकीय बंडखोर वेब पोर्टलवरही प्रकाशित केले होते. त्याची लिंक फेसबुकवर शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांच्या कमेंट आल्या. परंतु रोहन पवार याने दि. 09/02/2025 रोजी सकाळी 10 वा. चे सुमारास ‘बाप होता बापच आहे आणि राहणार तुमचा’ अशी कमेंट टाकली. त्यामुळे गौतम भंडारे यांनी ‘तुझा बाप असेल, आमचा बाप एकच आहे आप्पा भंडारे आणि आमचा उध्दारकर्ता बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशी कमेंट टाकली. त्यानंतर रोहन पवार याने गौतम भंडारे यांना खालच्या दर्जाचे दाखविण्यासाठी ‘मला नाही वाटत असं’ अशी कमेंट टाकली. त्यामुळे त्यांनी ‘तुझ्यासारखी औलाद नाही माझी’ अशी कमेंट टाकल्यानंतर रोहन पवार याने ‘त्याच्यापेक्षा खालची आहे’ अशी कमेंट टाकुन गौतम भंडारे यांचा फेसबुक वॉलवर खालच्या दर्जाचा ठरवून अपमान केला आहे. त्यामुळे गौतम भंडारे यांनी रोहन पवार याचेवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी नारायण शिरगावकर करीत आहेत.
सोशल मीडियावर कमेंट करणे फॅड होऊन गेलेले आहे. राजकारणातील नेतेमंडळी यांच्यावर राजकीय टीकाटिपणी मधून सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर अनेक जण स्वतःचे बापावर टीका झाली आहे, अशा पद्धतीने सोशल मीडियावर फाजील कार्यकर्ते आव आणतात. अनेक पत्रकारांच्या बातम्यांवर सुद्धा फाजील कार्यकर्ते बेजबाबदारपणे कमेंट करीत असतात. अनुसूचित जातीतील पत्रकार ॲट्रॉसिटी दाखल करीत असतात. इतर समाजातील पत्रकार सुद्धा मानहानीचा दावा दाखल करू शकतात. गौतम भंडारे यांनी दाखल केलेली तक्रार योग्यच आहे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.