ताज्या बातम्याराजकारण

अकलूज येथे भारतीय जनता पार्टी स्थापनादिन भाजप शहराच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीने साजरा..

तब नही डरे तो अब क्या डरेंगे – समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते..

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापना दिन कार्यक्रम संपन्न…

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचा 46 वा स्थापना दिन अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथे भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटर सायकल रॅलीने उत्साहात स्थापना दिन साजरा करण्यात आला.

प्रथम राष्ट्र, सुशासन, विकास, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रावर उभी राहिलेली विचारधारा म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. संघर्ष, कार्यकर्त्यांचे निस्वार्थी परिश्रम आणि जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला हा प्रवास आज देशाला नवी दिशा देत आहे. सहा एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. त्या दिवशीपासून पेटलेली ही विचारांची ज्योत आजही त्याच तेजाने राष्ट्रसेवेच्या मार्गावर प्रज्वलित आहे. या मूल्यांच्या बळावर राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अधिक दृढ करणाऱ्या देशातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो..

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे व भाजपच्या सर्व पदाधिकारी यांनी स्थापना दिनानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले होते. मोटरसायकल रॅली अकलूज नगर परिषद कार्यालय येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सदुभाऊ चौक, गांधी चौक, विजय चौक, शिवापूर पेठ ते मारुती मंदिर या ठिकाणी मोटरसायकल रॅलीची सांगता करण्यात आली.

मोटरसायकल रॅलीत भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणांनी रॅली मार्ग परिसर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडलेला होता, मोटरसायकल रॅलीमध्ये समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते व अनेक महिला पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतलेला होता. रॅलीच्या सांगता वेळी भाजपचे निष्ठावान व ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मान करण्यात आला. ॲड. संजय दोशी, बाळासाहेब वावरे यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला..

समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते उपस्थित रॅलीतील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, एक काळ असा होता जेव्हा आपले दोन खासदार होते, आणि आता सलग भारतीय जनता पार्टीचेच सरकार आहे. तब नही डरे, तो अब क्या डरेंगे, त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगणं आहे की, आपण सुरुवात करतो आणि विजयही आपलाच असतो. मी अकलूज मधील सगळ्या कार्यकर्त्यांना जवळून ओळखते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उत्तम काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय समर्पणेने आणि निष्ठेने काम केले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून आपण करत आहात. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते, कारण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पार्टी ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये दिमाखात उभी आहे. भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे जी केवळ तत्वांवर चालते, देशप्रेमावर चालते. भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष येऊन गेले, येऊन जाणार ही आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीनेच केवळ तत्त्वाने आपला झेंडा रोवला आहे. आणि पक्षाच्या या यशाचं श्रेय मी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देते. अकलूजमध्ये आणि माळशिरस मतदार संघामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचं काम जोमाने करू. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आपण सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे, भारतीय जनता पार्टीचे काम निश्चितपणे उंचीवर नेऊया, असे बोलून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button