अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सातत्याने सत्यशोधक विवाह घडावेत – सत्यशोधक रघुनाथ ढोक

फुले एज्युकेशन तर्फे सुवर्ण महोत्सवी सत्यशोधक विवाह सोहळा दिमाखात संपन्न…
चाकण (बारामती झटका)
फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता चाकण स्वयंवर मंगल कार्यालय येथे उच्चशिक्षित सत्यशोधिका दीपाली विश्वनाथ शेवकरी, BCA, LLB, चाकण आणि सत्यशोधक पंकज ज्ञानेश्वर आहेर, CA यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सुवर्ण महोत्सवी मोफत सत्यशोधक विवाह सोहळा दिमाखात संपन्न झाला. फुले एज्युकेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत प्रबोधन करीत हे विधी कार्य पाडले. तसेच वर-वधू यांचेकडून शपथ पत्र वाचून घेऊन दीपप्रज्वलन करीत या विज्ञानयुगात आम्ही दोघे श्रमाने पुढे जात इतरांनाही मदत करू. तसेच मानवता धर्म पाळून नव्या जीवाचे योग्य प्रकारे पालन पोषण करू या पद्धतीचे वचने घेत आधुनिक पद्धतीने सात फेरे घेत, स्री-पुरुष समानता असल्याने कन्यादान प्रथेला फाटा देण्यात आला. विवाहाचे सुरुवातीला वधू-वरांनी हातामध्ये राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय धरून फुलांच्या पायघड्यावरून सनई, ढोल, तुतारी, पिपाणी या वाद्याचे गजरात महापुरुषांचे नावाने जयघोष करीत इतर ग्रंथाचे पूजन करीत फुले दांपत्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन व सत्यशोधक विवाह व संस्थेच्या कार्याविषयी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांनी माहिती दिली. यावेळी अक्षदा म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले.
यावेळी वधू-वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम जेष्ठ माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे व उद्योजक तुकाराम शेठ कांडगे आणि ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले. तर वधू-वर यांचे आई-वडील व मामा-मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. या प्रसंगी वसंत लोंढे यांनी महात्मा फुले यांनी लावलेल्या लग्नाची व दक्षिणासाठी कोर्टात केस कशी चालली आणि कशी जिंकली याची सत्य कथा सांगत मौलिक मार्गदर्शन करीत आहेर आणि शेवकरी परिवाराचा हा आदर्श विवाह सोहळा पार पाडला म्हणून आभार मानले.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, या चाकण नगरीत आमच्या संस्थेने 19 मार्च 2019 ला मोनिका हॉटेलमध्ये पहिला पुनर्विवाह सत्यशोधक विवाह, अहमदाबाद अनिकेत राऊत आणि रूपा महाजन भुसावळ यांचा स्वतः जमवून लावला आणि आज उच्चशिक्षित दिपाली शेवकरी आणि पंकज आहेर यांचा चाकण नगरीच्या कृषी उ. बाजार समिती आवारात थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा राष्ट्रीय नेते शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे शुभ हस्ते पार पडल्यानंतर प्रथमच आमचा सुवर्ण महोत्सवी सत्यशोधक विवाह सोहळा मोफत पार पडण्यास सौ. मंगल शेवकरी यांनी मोठी मदत केल्याचे सांगून पुढे ढोक म्हणाले की, अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सातत्याने या चाकण नगरीत सत्यशोधक विवाह व इतर विधी या पुढे सत्यशोधक पद्धतीने घडावेत, तरच आपण फुले दाम्पत्यांचे विचार अंगीकृत केल्याचे समाधान मिळेल असे म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक ध्रुवशेठ कानपिळे, सुप्रीम कोर्टाचे वकील के. टी. पलूस्कर, झेड. पी. माजी सदस्य माउली काळोखे, कृषी उ. बाजार समितीचे माजी सदस्य अमृतनाना शेवकरी, अनिल पठारे, माजी नगरसेवक आळंदीचे ज्ञानेश्वर रायकर, उद्योजक मनोहर दिवाने आणि श्री संत सावतामाळी वधू-वर सूचक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनसमुदाय हा सत्यशोधक विवाह सोहळा पाहण्यासाठी उपस्थीत होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.