आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

अंथरुणावरूनच ‘तो’ झालाय कुटुंबाचा “कणा!”

पनवेल (बारामती झटका)

जन्मत:च शारीरिक अपंगत्वामुळे दुसऱ्याच्या आधाराशिवाय जागेवरून थोडाही हलू न शकणारा परीक्षित पीएचडीच्या पहिल्या पायरीवर मात्र यशस्वी झाला आहे. नुकतेच त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याचबरोबर अंथरूणात पडूनच आजवरचे शिक्षण पूर्ण केलेला परीक्षित त्याच्या छोट्याशा कुटुंबाचा आधार बनला आहे. तीन वर्षांपासून तो राजकीय बॉलिवूड कलाकारांसाठी इंटरनेट मार्केटिंग मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.

दहावीच्या परीक्षेत अंथरूणावर पडून पेपर लिहिणारा पनवेलचा परीक्षित शहा हा मुलगा पहिल्यांदाच प्रकाशझोतात आला. हाडे ठिसूळ असल्यामुळे परीक्षित स्वत:च्या पायावर कधी उभा राहू शकला नाही. ऑस्टिओजेनेसिस नावाचा आजार असल्यामुळे आईच्या आधाराशिवाय परीक्षित एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. मात्र, अभ्यासात हुशार असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे तो शिक्षण पूर्ण करू शकला. आधी दहावी आणि नंतर बारावीच्या परीक्षेत प्रसारमाध्यमात चमकलेला परीक्षित त्यानंतर मात्र पुन्हा दिसलाच नाही. मात्र या कालावधीत परीक्षितने एकाही वर्षांचा खंड न पडता एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

कायम प्रथमश्रेणी उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षितने शिक्षणात बाजी मारली आहेच. मात्र लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या परीक्षितला जन्म दिल्यानंतरही पोटातल्या गोळ्याप्रमाणे २५ वर्ष मुलाला सांभाळणाऱ्या आईचा तो आता आधार बनला आहे. बी.कॉम.चे शिक्षण घेत असल्यापासून राजकारणाची आवड असल्यामुळे लॅपटॉपच्या साह्याने अंथरुणात खिळून असलेला परीक्षित सोशल मीडियावरून जगाच्या संपर्कात असायचा. कॉलेजला फक्त परीक्षेसाठी जायचा. अनेकदा मुंबई विद्यापीठाने घरातच सुपरवायझर पाठवून पेपर लिहिण्याची मुभा दिली. अर्थशास्त्र विषयात त्याने पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला. त्यानंतर तो मागील तीन वर्षांपासून इंटरनेट मार्केटिंगसाठी काम करतो. चेन्नई येथील मित्राच्या मदतीने एक कंपनी स्थापन करून राजकीय, बॉलिवूड कलाकारांसाठी मार्गदर्शक म्हणून तो काम करतो. या कामामुळे आई आणि परीक्षित या दोघांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला आहे.

औषधोपचारामुळे शिवणकाम आणि नातेवाईकांची मदत यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबाला परीक्षितच आता आधार ठरला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये परीक्षितने मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयात अर्बन डेव्हलपमेंट विषयावर पीएचडी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाची परीक्षा दिली आणि पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्याचबरोबर लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर काम करणाऱ्या परीक्षितला कामासाठी दिवसही पुरत नाही. रात्री उशिरापर्यंत काम करीत असतो, अशी माहिती अभिमानाने आई विजयालक्ष्मी दिलीप शाह यांनी दिली. आरबीआयच्या ग्रेड बी च्या पदावर झोनल ऑफिसरपदाची परीक्षा तो देऊ शकतो. याशिवाय कॉलेज व्यवस्थापनाने ठरविल्यास प्राध्यापक म्हणूनही तो काम करण्यास पात्र आहे. आईने हात दिल्याशिवाय कोणतीच कृती करू न शकणारा परीक्षित आणि आई आता एकमेकांना आधार ठरले आहेत.

संतोष द. पाटील

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button