अतिवृष्टी मदतीचा शासन निर्णय निघाला
मुंबई (बारामती झटका)
राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मदत, पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, दि. २२/६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
यापूर्वी दि. १० जानेवारी २०२४ व दि. ३१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रु. १४४.१० कोटी व रु. २१ हजार ०९.१२ कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दि. २ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी, २०२४ ते मे, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रु. ५९६.२१ कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.