बाजारभावापेक्षा दुप्पट दरात विकले स्वीट कॉर्न; थेट कंपनीसोबत करार

करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यातील शेवगावचा हा आहे ‘फार्मर कप’चा शेलगाव क. कृषी माता शेतकरी गट. या गटाने नाशिकमधील सह्याद्री फार्म्स कंपनीसोबत तीन महिन्यांपुर्वी स्वीट कॉर्न मकेचा एक धाडसी करार केला होता. सोबतचं फार्मर कपमधील शास्त्रज्ञांच्या व कंपनीच्या SOPs चे व्यवस्थित पालन केले. पहिल्याच प्रयोगातील उत्तम दर्जाचे स्वीट कॉर्न पाहून कंपनीकडून खूप कौतुक झाले.
आतापर्यंत गटाने दोन शेतकऱ्यांची ८ टन मका कंपनीला पाठवली आहे. सध्याला बाजारात प्रति किलो ५-६ रुपयाला जाणारे हे स्वीट कॉर्न कंपनीने १२.५ रुपयाने खरेदी केले आहे. कंपनीच्या करारानुसार दर ११ रु. प्रति किलो असा होता. पण करमाळ्यातील हा स्वीट कॉर्नचा कंपनीसोबतचा पहिलाचं प्रयोग असल्याने त्यांनी प्रोत्साहनपर हा दर वाढवला. यातून त्यांना १ लाख रु. इतके उत्पन्न मिळाले. यामुळे गटात एक नवी उर्जा, उत्साह संचारला आहे.

गटातील सदस्या स्वाती वीर म्हणतात कि, “गटात आल्याने हा नवीन प्रयोग करायचे धाडस आम्हाला मिळाले. यात दुहेरी फायदे आहेत. एक आहे स्वीट कॉर्नचे दाणे तर दुसरं म्हणजे राहिलेल्या पाचटांपासून जनावरांसाठी उत्कृष्ट गुणवत्तेचा मुरघास. संततधार पावसामुळे काढणीत अडथळाही येत होता पण संपुर्ण गट एकत्र आला आणि लागला कामाला. मजेत कधी काढणी पूर्ण झाली हेही कळाले नाही.”

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.