बनावट तणनाशक औषधे तयार करणाऱ्या टोळीला अटक, १२.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा पोलिसांची मोठी कारवाई, बनावट ‘राउंडअप’ तणनाशक विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सातारा (बारामती झटका)
सातारा पोलिसांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट तणनाशक औषधांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत १२ लाख ५९ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील रेवडी (ता. कोरेगाव), फलटण आणि वडूज (ता. खटाव) येथील कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
गुप्त माहिती आणि सापळा :
मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही लोक करंजे नाका येथे चारचाकी गाडीतून शेतीसाठी बनावट औषधे विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून कारवाईचा तोंडी आदेश मिळवला. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक श्री. ढमाळ आणि डीबी पथकाचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.
अटक आणि मुद्देमाल जप्ती :
दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास करंजे नाका येथे सापळा रचण्यात आला. मोलाचा ओढा बाजूकडून येणारा एक टेम्पो (क्र. एम.एच.११ बी.एल.०१७३) थांबवण्यात आला. चालकाचे नाव धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१, रा. शाहुपूरी, सातारा) असे सांगितले. टेम्पोत शेतीसाठीची औषधे असल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने, ‘टू बडी कन्सलटींग प्रा. लि.’ कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांच्या मदतीने गाडीतील औषधांची तपासणी करण्यात आली. पिसाळ यांनी सदर औषधे ‘बायर’ कंपनीच्या ‘राउंडअप’ या नावाने विकली जाणारी बनावट औषधे असल्याची खात्रीशीर माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ चालकासह टेम्पोला ताब्यात घेतले. दोन पंचांसमक्ष २,०६,७०० रुपये किमतीच्या ‘बायर’ कंपनीच्या ‘राउंडअप’ बनावट औषधांच्या एकूण २६० बाटल्या आणि १,००,००० रुपये किमतीचा टाटा कंपनीचा छोटा टेम्पो जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास:
याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), कॉपी राईट कायदा १९९९ चे कलम ६३,६५ आणि ट्रेड मार्क कायदा १९९९ चे कलम १०३,१०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची चौकशी आणि कारखान्यांवर छापे:
अटक केलेल्या आरोपी धैर्यशील अनिल घाडगे याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक ढेरे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांनी तपास पुढे नेला. या तपासात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील रेवडी (ता. कोरेगाव), फलटण आणि वडूज (ता. खटाव) येथील कारखान्यांमधून एकूण १२,५९,३७० रुपयांचे ‘बायर’ कंपनीचे बनावट ‘राउंडअप’ औषधे आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ करत आहेत.
अटक केलेल्या आरोपींची नावे:
१. धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१, रा. जीएफ. इसाई वैष्णव अपार्टमेंट समता कॉलणी शाहुपुरी सातारा)
२. युवराज लक्ष्मण मोरे (वय २८, रा. रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा)
३. गणेश मधुकर कोलवडकर (वय ३०, रा. धालवडी ता. फलटण जि. सातारा)
४. निलेश भगवान खरात (वय ३८, रा. जाधववाडी ता. फलटण जि. सातारा)
५. तेजस बाळासो ठोंबरे (वय ३०, रा. वडुज ता. खटाव जि. सातारा)
६. संतोष जालिंदर माने (वय ४५, रा. नडवळ ता. खटाव जि. सातारा)
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. ढेरे, पोलीस उपनिरीक्षक ढमाळ आणि पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



