बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांना गती देणार – उदय सामंत, उद्योगमंत्री

बारामती (बारामती झटका)
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने बारामती व पणदरे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील लहानमोठ्या उद्योगांचे विविध अडचणी सोडवणे व शासनाकडून उद्योगांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी अनेक प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यावर मंत्रालय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय दौऱ्यानिमित्त उदय सामंत बारामती विमानतळावर आले असता बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे शिष्टमंडळाने त्यांच्याशी संवाद साधला व निवेदन दिले, त्याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य हरिचंद्र खाडे यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर, उपअभियंता उपेंद्र गलांडे यावेळी उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून उद्योग विभागाला वेळोवेळी अनेक प्रस्ताव दिलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कामगारांसाठीचे ईएसआयसी हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा हस्तांतर करणे, पणदरे एमआयडीसीमध्ये मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे, बारामती एमआयडीसीला पिण्याचा पाणीपुरवठा होण्यासाठी निरा डावा कालव्या वरून पाईपलाईन मंजूर करणे, बारामती एमआयडीसी लगत ड्रायपोर्ट ची निर्मिती करणे, बारामती एमआयडीसी मध्ये लघुउद्योगांसाठी लहान बुरवंड उपलब्ध करून देणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी भूखंड राखीव ठेवणे, भविष्यातील वाहतूक व पार्किंग समस्या विचारात घेऊन नवीन ट्रक टर्मिनससाठी जागा उपलब्ध करणे, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील बांधकामांचे रेडी रेकनर चे वाढीव दर कमी करणे असे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उद्योग विभागाकडे दिले आहेत. पाठपुराव्यासाठी या सर्व प्रस्तावांचे एकत्रित निवेदन आज उद्योगमंत्री उदय सावंत यांना दिले असून त्यावर लवकर कार्यवाही होण्यासाठी उद्योगमंत्र्यांना विनंती केली असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.