बसवेश्वर महामंडळाचे 9 जणांना कर्ज मंजुरी…

शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्थेच्या पाठपुराव्याला यश…
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाज्यातील सर्व बंधु-भगिनींसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज वितरण संदर्भात जिल्हास्तरीय एक दिवसीय शिबीर शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था अकलूज यांचेवतीने महादेव मंदिर, बसवेश्वर पथ, अकलूज येथे दि. 25/06/2024 रोजी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले होते.
शिवशक्ति संस्थेने सबंधित लाभार्थ्यांच्या वतीने वारंवार बसवेश्वर महामंडळाच्या कार्यालयात पाठपुरावा केलेला होता. त्या अनुषंगाने दि. 27/08/2024 रोजी शिवशक्ति सामाजिक संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार बसवेश्वर महामंडळाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून थेट कर्ज योजनेच्या अंतर्गत – 5 अर्ज आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 10 लाख योजनेच्या अंतर्गत – 17 अर्ज म्हणजेच एकूण – 22 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी महामंडळाकडून 9 कर्ज प्रकरणांना मंजुरी (एल.वाय.आदेश) देण्यात आलेले असून पुढील कामकाज सुरू आहे.
आता संबंधित अर्जदार यांनी त्यांच्या बॅंकेत नियमानुसार कर्ज मंजुरी घेवून बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र पुन्हा बसवेश्वर महामंडळाचे कार्यालयात जमा करावे लागेल. त्यानंतर सबंधित लाभार्थी यांना महामंडळाकडून अंतिम कर्ज मंजुरी आदेश देण्यात येणार आहे.

तसेच जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज वितरण संदर्भात काही अडीअडचणी आहेत. संबंधित महामंडळाने बँकांना कर्ज मंजुरी संदर्भात पत्र दिले नाही. बसवेश्वर महामंडळाच्या अंतर्गत वितरण करण्यात येणारे कर्ज फक्त विरशैव लिंगायत समाज्यातील व्यक्तिलाच दिले गेले पाहिजे, कर्ज वितरण करताना शेत जमीनीबरोबरच इतर सर्व स्थावर मालमत्ता तारण म्हणून घेण्यात याव्यात, महामंडळाच्या अंतर्गत सध्या 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. ती कर्जमर्यादा वाढवून 25 लाखापर्यंतचे कर्ज वितरण करण्यात यावे आणि महामंडळाचे मुख्य कार्यालय आणि जिल्हा स्तरावरील कार्यालयात कर्मचारी भरती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था विधान परिषदेचे आमदार श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील, श्री. आनंद मालुसरे (जिल्हा व्यवस्थापक – बसवेश्वर महामंडळ सोलापूर) आणि सौ. रजनी लगशेट्टी (लेखापाल – बसवेश्वर महामंडळ सोलापूर) यांच्या सहकार्याने प्रशासकीय स्तरावर पुढील काम करत आहे, अशी माहिती शिवशक्ति संस्थेचे अध्यक्ष श्री. महेश प्रकाश डिकोळे यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.