भाजप सदस्यता अभियानाद्वारे संघटना बळकट करा – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. प्रत्येक तीन वर्षांनी सदस्यांची पुन्हा नोंदणी करण्याची योजना भाजप करत असते. यामुळे संघटन पर्व अंतर्गत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या सदस्यांबरोबरच नवीन नागरिकांच्या घरी जावून सदस्य नोंदणी करुन घ्यावी. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावात, चौकाचौकात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उभे राहून नागरिकांना आवाहन करून सदस्य करून घ्यावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा सदस्य नोंदणी अभियानाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून प्रत्येक कार्यकर्ता या अभियानात सहभागी झाला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी संघटन पर्व अंतर्गत लोकांपर्यंत जाऊन त्यांना सदस्य करून घेऊन भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करावे, अशा सूचनाही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केल्या. भारतीय जनता पार्टी या सदस्य नोंदणी बरोबरच सक्रिय कार्यकर्ते, सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा करत आहे. या सक्रिय सदस्यांमधूनच नवीन पदाधिकार्यांच्या निवडी होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. भाजपमध्ये तीन वर्षांतून एकदा संघटन पर्व होत असते. या पर्वात केंद्रापासून ते प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होते. राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणाऱ्या आणि जगभरात सर्वांत जास्त प्राथमिक सदस्य असलेला एकमेव भाजप आहे, असेही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना पक्षासोबत जोडण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारत सर्वांना बनवायचा आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी सगळे एकत्र काम करणार असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
संघटन पर्व अंतर्गत भाजपची सदस्यता मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे स्वतः जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात, घरोघरी जावून जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात भारतीय जनता पार्टीचा सदस्य असेल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत स्वतः गावोगावी जावून आठवडा बाजार, दुकानात, घरोघरी जावून भाजप सदस्य नोंदणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.