भांबुर्डी गावात पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा व हलगी नाद आंदोलन होणार….

माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू वाघमोडे यांचे निवेदन…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाणी मिळेपर्यंत २४/३/२०२५ रोजी माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर घागर मोर्चा व हलगी नाद आंदोलन करणार असल्याचे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू अण्णा वाघमोडे यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. सदरच्या निवेदनावर आनंदराव देवकाते, सोमनाथ रामचंद्र सुतार, शशी नारायण वाघमोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मौजे भांबुर्डी येथे जलजीवन मिशन योजनेचे काम दोन वर्षापासून मंजूर असून अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. तसेच ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने त्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच यापूर्वी वारंवार नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी दिलेल्या आहेत. त्या सर्व तक्रारीवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई व चौकशी झालेली नाही. त्यामुळे कोणतीही दखल न घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
दि. १९/३/२०२५ पर्यंत पिण्याचे पाणी न चालू झाल्यास दि. २४/३/२०२५ रोजी घागर मोर्चा काढून हलगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस स्टेशन, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती माळशिरस व प्रशासक भांबुर्डी ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.