ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष “एक” मात्र माळशिरस तालुक्यात दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठका “दोन”

नीरा आणि भीमा दोन नद्यांचे प्रवाह एकत्र येऊनसुद्धा स्वतंत्र वाहतात, तसाच प्रकार भाजपचे खुर्द आणि बुद्रुक एकत्र येऊनही मतभेद चव्हाट्यावर.

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे नियोजित दौरा आहे. या दौऱ्यासाठी माळशिरस तालुक्यात शिवरत्न बंगला शंकरनगर, अकलूज व शासकीय विश्रामगृह, माळशिरस येथे नियोजनाच्या बैठका दोन दिवशी दोन ठिकाणी होणार आहेत‌. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एक मात्र, माळशिरस तालुक्यात दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठका दोन असल्यामुळे नीरा आणि भीमा दोन नद्यांचे प्रवाह एकत्र येऊनसुद्धा स्वतंत्र वाहतात‌. तसाच प्रकार भाजपमध्ये खुर्द आणि बुद्रुक गट एकत्र येऊनही मतभेद चव्हाट्यावर असल्याची चर्चा भाजप विरोधी गोटामध्ये सुरू आहे.

भारतीय जनता पार्टीचे माळशिरस विधानसभा प्रमुख धैर्यशील मोहिते पाटील यांची सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे, सोमवार दि. 04/12/2023 रोजी सायंकाळी चार वाजता शिवरत्न बंगला येथे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केलेले आहे. भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांची सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे, मंगळवार दि. 05/12/2023 रोजी दुपारी 12 वाजता माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केलेले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा तालुक्यात दौरा असताना दोन बैठका घेण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम असते, तर वेगवेगळ्या बैठका होणे साहजिक आहे. मात्र, अकलूज येथील नियोजित दौऱ्यासाठी दोन बैठका याची जोरदार चर्चा विरोधी गटात सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकटेच आहेत. मात्र, दौऱ्याच्या नियोजनाच्या खुर्द व बुद्रुक गटाच्या दोन बैठका होत आहेत‌. निरा आणि भीमा दोन नद्यांचे प्रवाह एकत्र येऊनसुद्धा स्वतंत्र वाहतात. पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर एका नदीचे पाणी गढूळ तर दुसऱ्या नदीचे पाणी स्वच्छ वाहत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुर्द व बुद्रुक यामधील गढूळ पाणी ओळखून राजकीय तुरटी फिरवून गढूळ पाण्याचा प्रवाह स्वच्छ करतील का ?, असाही राजकीय वर्तुळामध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्या गटाच्या नियोजनाने कार्यक्रम संपन्न होईल ?, का दोन्ही गटाचे मनोमिलन करतील ?, का खुर्द किंवा बुद्रुक गटाची कान उघडणी करतील, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button