भारतीय जनता पक्षाचे संघटन माळशिरस तालुक्यात नवीन वर्षात वाढणार का ?
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसणार का..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला माळशिरस तालुक्यात गत वर्षापासून मरगळ आलेली आहे. नवीन वर्ष आजपासून सुरू होत आहे. माळशिरस तालुक्यात नवीन वर्षात पक्ष संघटन वाढणार का ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसणार का ?, अशीही माळशिरस तालुक्यातील निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार स्थापन झाल्यानंतर तालुका, जिल्हा व राज्य पदावर काम करणारे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला केंद्रातील व राज्यातील योजनेचा लाभ देऊन खऱ्या अर्थाने पक्षाची बळकटी करण्याची गरज आहे. मात्र, माळशिरस तालुक्यात पक्ष संघटन विस्कळीत झालेले पहावयास मिळत आहे. गतवर्षी चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झालेल्या असल्याचा फटका लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत बसलेला आहे. याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ नये.
तालुक्यामध्ये अनेक पदे रिक्त आहेत, पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्याशिरावर माळशिरस तालुक्यातील मतदार, सर्वसामान्य जनता विसंबून आहे. खऱ्या अर्थाने भाजपचे संघटन मजबूत असल्यानंतर लोकप्रतिनिधींना संघटनेची जोड मिळते. यासाठी नवीन वर्षात माळशिरस तालुक्यातील संघटन वाढणार का ?, असाही प्रश्न भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसमोर उभा राहत आहे. शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी श्री. रवींद्रजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत पक्षीय संघटन मजबूत करण्याकरता माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल करून सक्षम पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली तरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा करिष्मा दिसणार आहे. अन्यथा पाठीमागील दिवस पुढे दिसतील, अशीही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.