भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी तयार; फडणवीस, चव्हाणांनी मारला शेवटचा हात

मुंबई (बारामती झटका) सरकारनामा साभार
राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून येत्या सोमवारी दि. 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाची उमेदवार निवडीसाठी लगबग सुरु आहे. त्यातच आता भाजपने उमेदवार निवडीत आघाडी घेतली आहे. भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.
ही यादी जिल्ह्याच्या प्रभारीकडे सोपविली आहे. मंगळवारी होत असलेल्या बैठकीत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असून येत्या दोन-तीन दिवसातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या तयारीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने त्यांच्या नगराध्यक्षपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयारी केली होती.
त्यावेळी भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येकी तीन नावे प्रभारीकडे दिली होती. त्यापैकी निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक असलेली तीन नावांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता या तीन नावावर प्रत्येक ठिकाणी पक्षाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये आता हेच सर्वेक्षण भाजपच्या मंगळवारच्या बैठकीत ठेवले जाणार आहे. या तीन व्यतिरिक्त काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथे नावही दिसत आहे. त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात होत आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर कोअर कमिटीची एक बैठक घेऊन यामध्ये एक नाव अंतिम केले जाणार आहे. त्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसातच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



