पिसेवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल – ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार.

पिसेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त जागेवर तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
पिसेवाडी (बारामती झटका )
पिसेवाडी ता. माळशिरस गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड करावी, यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांनी निवेदन देऊन तंटामुक्ती अध्यक्ष निवड करावी अशी मागणी केलेली आहे. पिसेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी राजीनामा दिलेला असल्याने रिक्त जागेवर तंटामुक्ती अध्यक्षाची निवड प्रलंबित ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे विधानसभा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी बोलताना सांगितले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, पिसेवाडी गावातील विद्युत पोलवर बसवलेले साधे बल्ब काढून चांगल्या दर्जाचे एलईडी बल्ब बसवावेत. जेणेकरून रात्री, अपरात्री चालत ये-जा करणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी. तंटामुक्ती अध्यक्ष पदाची रखडलेली निवड तात्काळ करावी. गावातील सार्वजनिक मंदिरे, सभामंडप वैयक्तिक मालकीची असल्यासारखे काही लोक वापरत आहेत. त्याची तात्काळ चौकशी करून सार्वजनिक नागरिकांना वापरण्यास द्यावीत. शालेय समितीत ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्य देण्यासाठी अधिकार असतो का ?, जर असतो तर यांची निवड कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता केलेली आहे. याही गोष्टींचा खुलासा व्हावा.

या सर्व बाबींचा तात्काळ विचार करून येत्या ८ दिवसात न्याय द्यावा. अन्यथा, ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदनावर सुनील गायकवाड, शिवाजी वाघमारे, सुधीर शेंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती पिसेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, सहाय्यक निरीक्षक वेळापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



