“चर्चा तर होणारच” देवाभाऊंच्या शुभेच्छाची रामभाऊ तुम्ही संघर्ष करीत रहा, तुमच्या पाठीशी पूर्ण ताकतीने भक्कमपणे उभे आहोत..

माळशिरस तालुक्यात एमआयडीसीचा मानस व नीरा देवधर पाण्याचा संकल्प बोलून दाखविला…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात थेट भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देताना रामभाऊ तुम्ही संघर्ष करीत रहा, आम्ही तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने भक्कमपणे उभे आहोत. माळशिरस तालुक्यात जनतेचे राज्य स्थापन होईपर्यंत तुमचा संघर्ष असाच चालू राहू द्या, अशा थेट मुख्यमंत्र्यांच्या वाक्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हजारो हत्तीचे राजकीय बळ आलेले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार माजी आमदार राम सातपुते यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस असतो. मांडवे (ता. माळशिरस) येथील श्रीराम निवासस्थानी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला होता. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक करून अनेक ठिकाणी देवी देवतांचे दर्शन दिवसभर करून सायंकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार, असे सोशल मीडियावर जाहीर केलेले होते. कोणतीही निमंत्रण पत्रिका अथवा फोनद्वारे संपर्क केलेला नव्हता. तरीसुद्धा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वैष्णव व भाविकभक्त उपस्थित असतात तशाच, पद्धतीने माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेली दमदार विकासाची कामगिरी व गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी सहज उपलब्ध होऊन जनतेची केलेली सेवा यामुळे माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आपला माणूस कामाचा माणूस रामभाऊ यांना शुभेच्छा देण्याकरता हजारो रामभक्त उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झालेली होती. भव्य व्यासपीठ व व्यासपीठासमोर कार्यकर्त्यांना बसण्याकरता खुर्च्यांची सोय केलेली होती. देवदर्शनावरून सात वाजता रामभाऊ यांचे आगमन झाले. हलग्यांच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतीशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळून तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी पंचतारांकित एमआयडीसी आणण्याचा मानस व्यक्त करून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न, निरादेवधरचे पाणी लवकरच तालुक्याला मिळवून देण्याचा संकल्प बोलून दाखविला. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच तालुक्यातील इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजप लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय आमदार उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला खोटा ठरणार असून लवकरच लागणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा तयार राहण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले. काही जण म्हणतात की, मी येथे फार दिवस राहणार नाही, पण मी कुठेही जाणार नाही, याच तालुक्यात राहून माळशिरस तालुक्याची सेवा करणार आहे. शेजारी तालुक्यात सगळीकडे एमआयडीसी सुरू झाल्या आहेत मात्र, या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे तो लवकरच सुरू होत आहे. मी गेल्या पाच वर्षात एखादी दूध संस्था किंवा साखर कारखाना काढला नाही मात्र, माणसं जोडण्याचा कारखाना मात्र नक्की काढला. त्यामुळे सकाळपासून कुणाच्या चिठ्ठीशिवाय लोक थेट माझ्याकडे येतात. अनेक रुग्णांची मी पुण्या-मुंबईत नेऊन मोफत शस्त्रक्रिया करून आणल्याने त्यांच्या दुवा माझ्या पाठीशी आहेत. पक्षाने मला या तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठीच पाठवले असल्याने मी पक्षाशी व जनतेशी गद्दारी करणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे पाणी, रस्ते, वीज आदी सुविधा कमी पडू दिल्या जाणार नाहीत.
असे सातपुते यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेला फोन त्यांनी उपस्थितांना ऐकवला. त्यानंतर त्यांनी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचे सगळ्यांना माहीत आहे. त्याबाबत न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असून सरकारने त्यासाठी वकील दिले आहेत, लवकरच हा दाखला खोटा असल्याचे जाहीर होऊन या तालुक्यातील विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. त्यामध्ये आपला दणदणीत विजय होउन भाजपचा पुन्हा एकदा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी केला.


भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बळ आपल्या पाठीशी असल्याने येत्या काळातील तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद अशा सर्व निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात लोकप्रतिनिधी यांच्या वाढदिवसाला पहिल्यांदाच सर्वसामान्य गोरगरीब व तळागाळातील कार्यकर्त्यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग, व्यापार या क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मपुरीपासून दसुरपर्यंत, शिंदेवाडी पासून कोळेगाव पर्यंत, कोथळे कारंडे पासून संगम बाभुळगाव पर्यंत, अशी कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केलेली होती. अनेक दांपत्य आपल्या लहान मुलांसह लोकप्रतिनिधीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते.
नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक श्री. राजेंद्र पांढरे उर्फ बॉस व सौ. कविता पांढरे या दांपत्यांनी आपल्या दोन मुली व मुलासह येऊन पवित्र तुळशीचा हार रामभाऊ यांना घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पेढा भरविला. रामभाऊ यांनी विकासकामातून व जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यामधून प्रत्येकाच्या मनामध्ये आपले विश्वासाचे नाते निर्माण केलेले आहे. अनेकांना आपला स्वतःचा भाऊ वाटतो, तर वयस्कर लोकांना आपला मुलगाच आहे, अशी प्रतिमा जनसामान्यांमध्ये रामभाऊ यांनी वर्तनुकीतून निर्माण केलेली आहे. अभिष्टचिंतन सोहळा पाच तास सुरू होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जशी भाविकांची दर्शनासाठी रंग असते, तशीच अभिष्टचिंतन सोहळ्यात आपले लाडके लोकप्रतिनिधी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता रांग लागलेली होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.