श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माळशिरस नगरपंचायत सज्ज, नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख.
माळशिरस (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शनिवार दि. 24 जून 2023 रोजी होत आहे. माळशिरस नगरपंचायत माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी पालखी सोहळ्यातील वैष्णव वारकरी व भाविक भक्तांसाठी सुख सुविधा केलेले याची माहिती सांगितली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन २०२३ च्या अनुषंगाने माळशिरस शहरामध्ये सालाबादप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे नियोजित वेळेमध्ये लाखो भाविकांसह आगमन होत असते. माळशिरस शहरांमध्ये पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत असलेल्या पालखी मैदान या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम असतो. पालखीसोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांची माळशिरस नगरपंचायतीकडून सोयीसुविधा पुरवण्यासाठी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. नितीन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केलेली आहे.

पालखी तळ व इतर परिसरामध्ये मुरूम टाकून लेवल करून घेतलेले आहे. माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील सर्व परिसर स्वच्छ करून काटेरी झाडे काढलेली असून गटारी साफसफाई केलेल्या आहेत. मॅलिथिॲन पावडर, टीसीएल पावडर व बायो कल्चर आरोग्य विषयक साहित्य करून त्या अनुषंगाने कामे केलेली आहेत. सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता केलेली आहे रात्रीच्या वेळी अंधाराची अडचण भासू नये यासाठी दिवाबत्तीचे नियोजन करून साहित्य खरेदी करून दिवाबत्तीची माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये सोय केलेली आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवण्याची कामे केलेली आहेत. पालखी तळावर भव्य मंडप उभारून दर्शन रांगेकरिता बेरिकेटिंग करून आपत्कालीन मदत केंद्र तयार केले आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता स्वागत स्टेज उभारलेले आहे. वारकरी यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पालखीतळ व इतर ठिकाणी केलेली आहे. माऊलींच्या वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारे अडचण व सुख सोयीमध्ये माळशिरस नगरपंचायत कमी पडणार नाही. सर्व नगरसेवक भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng