दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोलापूरमध्ये जागरूकता रॅली…

भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी नागरिकांना दिला संदेश
सोलापूर (बारामती झटका)
दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ च्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर तर्फे शहरात भ्रष्टाचाराविरोधातील जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी ही रॅली भव्य उत्साहात पार पडली. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. “लाच देऊ नका, लाच घेऊ नका, भ्रष्टाचाराला नकार द्या” या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
या रॅलीमध्ये पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी मार्गदर्शन केले. रॅलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील २ अधिकारी व १३ कर्मचारी, पोलीस आयुक्तालयातील ०७ अधिकारी व १० कर्मचारी, ५० आरसीपी पथकाचे पोलीस कर्मचारी तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

रॅलीचा मार्ग पोलीस आयुक्त कार्यालय — गांधी चौक — सात रस्ता — रंगभवन चौक असा ठेवण्यात आला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय येथे समारोप झाला.
उपअधीक्षक प्रशांत चौगुले म्हणाले,
“भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही फक्त प्रशासनाची नाही; प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आणि तक्रार करण्यासाठी पुढे येऊन या मोहिमेत हातभार लावला, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन उभे राहील. लाच देऊ नका, सहकार्य करा, आणि चुकीला कधीही पाठीशी घालू नका.”
या रॅलीतून भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक शासनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



