दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी

सोलापूर (बारामती झटका)
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस ओबीसी उपाध्यक्ष सुधीर लांडे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस भीमराव बाळगे, उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, राशीद शेख, सचिव महंमद शेख, कय्युम बलोलखान यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाकडून विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह यांना उमेदवारी दिल्यास मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. तसेच आघाडीचे इतर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतील. विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उच्च विद्या विभूषित असून जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळेच सोलापूर लोकसभेला काँग्रेसचा विजय होऊ शकला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मधून डॉ. धवलसिंह यांना उमेदवारी दिल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा आमदार निवडून आणणार असल्याचे सांगितले.

दक्षिण सोलापूर काँग्रेसचा बालेकिल्ला असून वरिष्ठांकडे उमेदवारीची छाननी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या जरी जास्त असली तरी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.