डिएपी, 10-26-26 च्या नावाखाली विकली माती ‘या’ कंपनीवर गुन्हा दाखल…
४७ लाखांनी शेतकऱ्यांची फसवणूक; पुण्यातील रामा फर्टिकेम कंपनीचा प्रताप
कृषी विभागाच्या तक्रारीवरून कंपनी अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा
पुणे (बारामती झटका)
खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खताची आवश्यकता असते. डिएपी, 10-26-26, युरीया यासारख्या खताची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या संधीचा फायदा काही कंपन्या घेत असुन शेतकऱ्यांची फसवणूक करतात. बनावट खताची विक्री करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते.
यंदा 2024 मध्ये डिएपी, 10-26-26 या दोन्ही खतांची पुणे येथील रामा फर्टिकेम लि. नावाच्या कंपनीने 3300 डिएपी आणि 10-26-26 या महाग खताच्या नावे 46 लाख रुपयांची माती विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामा फर्टिकेम चे जबाबदार अधिकारी विकास रघुनाथ नलावडे यांच्यावर नगर पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा रामा फर्टीकेम या खत उत्पादक कंपनीने घेतला. या कंपनीने जिल्ह्यात यंदा २० जून पर्यंत २१०० बॅग १०:२६:२६ आणि १२०० बॅग डीएपी ची विक्री केल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले.
जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी २० जूनला तिवसा तालुक्यातील मार्डा येथील निलेश कृषी सेवा केंद्रातून नियमित तपासणीसाठी रासायनिक खताचे नमुने घेतले. त्यामध्ये रामा फर्टीकेम वडकी, पुणे या कंपनीने उत्पादित डीएपी खताचा नमुना घेतला आणि तो नमुना विश्लेषणासाठी प्रयोग शाळेत पाठवला. त्यानंतर २५ जूनला हे खत अप्रमाणित असल्याचे समोर आले. त्यामुळे कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्या नेतृत्वात कृषी उपसंचालक उज्वल आगरकर तसेच कृषी विभागाने जिल्ह्यात कोठे कोठे या कंपनीचे खत विकले, याची माहिती घेतली. त्यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील शुभम कृषी केंद्र येथे १०:२६:२६ हे खत असल्याचे माहीत झाले.
कृषी विभागाने त्या ठिकाणी जाऊन नमुने घेतले आणि प्रयोगशाळेकडून तपासणी केली असता या खतांमध्ये आवश्यक घटक नगन्य प्रमाणात असल्याचे समोर आले. याच दरम्यान कृषी विभागाने रामा फर्टीकेम या कंपनीचे डीएपी आणि १०:२६:२६ जिल्ह्यात कोणत्या वितरकाकडे आले याबाबत माहिती घेतली. सदर कंपनीकडून डीएपी आणि १०:२६:२६ या खतांचा पुरवठा शहरातील मंदार ऍग्रो सर्विसेस, जाफरजीन प्लांट अमरावती यांच्याकडे आल्याचे समोर आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.