डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी.. शतकपूर्तीनिमित्त ११ जूनला लंडन येथे जागतिक परिषदेचे आयोजन
भारताच्या १०० वर्षाची वाटचाल व वर्तमान आर्थिक स्थितीवर भाष्य
सातारा (बारामती झटका)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकस मध्ये ‘दि प्रॉब्लेम ऑफ दि रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन‘ या विषयावरील प्रबंध डी.एस.सी. पदवीसाठी सादर केला होता. त्यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये डी.एस.सी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या घटनेला २०२३ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. बाबासाहेबांनी ब्रिटीशांचे शासन असतानाही भारताच्या रुपयाचे अवमूल्यन रुपयाच्या अस्थिरतेमुळे होणारे भारतीयांचे शोषण यावर पुराव्यानिशी विश्लेषण केले होते. या प्रबंधातून सडेतोड भूमिका मांडून सरकारचे दोषही दाखवले होते. त्यांनी ग्रंथ प्रकाशित करून ब्रिटीश सरकारला व अर्थशास्त्रज्ञ यांना वस्तूस्थिती दाखवली होती. त्यामुळेच पुढे २७ ऑगस्ट १९२५ ला चलन पद्धतीत बदल करण्यासाठी एडवर्ड यंग अध्यक्षतेखाली याच्या रॉयल कमिशनची नियुक्ती झाली. भारतात आर्थिक विषमता का निर्माण झाली, हे बाबासाहेबांनी पटवून देऊन सुवर्ण विनिमय प्रमाप पद्धतीस विरोध केला. हा ग्रंथ केवळ पदवी मिळविण्यासाठी लिहिलेला प्रबंध नव्हता तर, पराकोटीची आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी मांडलेली मते आजही उपयुक्त आहेत. या ग्रंथावर १०० वर्षानंतर पुनर्विचार व्हावा, भारतातील आर्थिक प्रश्नांचा इतिहास कळावा, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी चिंतन व्हावे, आर्थिक वास्तव समजून भविष्यातील सुधारणासाठी वस्तुनिष्ठ भाष्य व्हावे, या विधायक हेतूने सायास सहकारी संस्था व मराठी अर्थशास्त्र परिषद यांनी ११ जून २०२४ रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकस येथे जागतिक परिषदेचे आयोजन केल्याची माहिती या परिषदेचे समन्वयक बार्टी व यशदा संस्थांचे माजी संचालक रविंद्र चव्हाण, पुणे यांनी दिली आहे. तसेच ६ जून ते १२ जून २०२४ काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्या ठिकाणी, तसेच इंग्लंड मधील सांस्कृतिक, साहित्य, लोकशाही विषयाशी संबंधित स्थळांना भेटी देणार आहेत.
या परिषदेसाठी भारतातून डॉ. संजोग रॉय, रविंद्र चव्हाण, डॉ. गजानन पट्टेबहादूर, डॉ. केशव पवार तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिकस मधील डॅनियल फाईन, डॉ. जीरेमी स्वीगेलर आणि डॉ. फ्रान्सिस्को हे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी भारतातून अंदाजे ३५ आणि अन्य देशातील २५ अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. ज्यात नामवंत न्यायाधीश, वकील, प्राध्यापक, शासन प्रशासन यातील उच्च अधिकारी, स्वखर्चाने लंडनला उपस्थित राहणार आहेत. भारतीय अर्थ व्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी १० थीमची निवड करून भारतातील नामवंत ५० विद्यापीठांना शोध निबंध लिहिण्यासाठी आवाहन केले आहे. १५ संशोधक या परिषदेत शोधनिबंध सादर करणार आहेत. या शिवाय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, इतर बँकेचे अधिकारी शोध निबंध पाठविणार आहेत. काही विषय तज्ञ ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सादर करण्यात आलेल्या विषयतज्ञ यांच्या भाषणाचे सादर केलेल्या निबंधाचे व ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २४ मध्ये प्राप्त झालेल्या शोधनिबंधाचे संकलन करून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेस तर्फे ग्रंथ तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब यांनी त्या काळात देखील प्रॉब्लेम ऑफ रुपी प्रबंधात धैर्य दाखवून निर्भयतेने भारतीयांच्या हितासाठी व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी मते व्यक्त केली आहेत ती आजही भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि सध्याच्या भारतीय आर्थिक प्रश्नाविषयी भाष्य करण्यासाठी ही परिषद आयोजित करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. तानाजी देवकुळे व कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील प्रा. विश्वनाथ सोनवणे हे आपला शोधनिबंध सादर करणार आहेत.
ज्यांना परिषदेत उपस्थित राहता येत नाही त्यांनी १० थीमच्या कोणतीही एक थीम घेऊन त्या अंतर्गत कोणत्याही उप विषयावर इंग्रजीत शोध निबंध लिहावा.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक विकासाची दृष्टी आणि समकालीन प्रासंगिकता, २. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय अर्थ व्यवस्था, ३. सामाजिक बहिष्कार आणि भारतीय अर्थव्यवस्था, ४. भारतीय मायक्रो फायनान्स आणि गोल्बल कपीटल फंड, ५. मुख्य गुंतवणुकीच्या मार्गाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या सरकारी रोख्यांचे परिणाम : भारतीय रुपयाची स्थिरता, ६. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकर्ण [LPG] : भारतीय अर्थव्यवस्थेवर तुलनात्मक प्रभाव, ७. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड : भारतीय उद्योग, बाजार आणि अर्थ व्यवस्था, ८. ग्लोबल फायनान्स कपिटल आणि नेशन स्टेट, ९. आर्थिक असमानता : प्रादेशिक आणि मानवी विकास, १०. दलित भांडवलशाही आणि काळी भांडवलशाही या थीम देण्यात आल्या आहेत. या विषयाशी संबंधित अनेक उपविषयावर सप्टेंबर अखेर शोधनिबंध पाठवावेत, असे रविंद्र चव्हाण मो. ९०४९ २०२०७८ यांनी कळविले आहे.
डॉ. बाबासाहेब यांनी अमेरिका येथील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी घेतली. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती हा शोधनिबंध त्यांनी १५ मे १९१५ ला विद्यापीठास सादर केला होता. १७९२ ते १८५८ या ६६ वर्षाच्या काळात इस्ट इंडिया कंपनीने भारताला काय दिले व इंग्लंडने काय मिळविले यावर त्यांनी संशोधन केले. वयाच्या २४ व्या वर्षी भारताबद्दलचा अभ्यास त्यांनी केला होता. एम.ए. झाल्यावर १९१७ साली त्यांनी ’ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती‘ हा पी.एच.डी. साठी प्रबंध लिहिला. हा ग्रंथही भारत देशाशीच संबंधित होता. या वेळी त्यांचे मार्गदर्शक प्रा. सेलीगमन होते. १९२५ ला पी.एस. किंग संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला. ब्रिटीश लोकांनी भारतात कसे कर लागू केले आणि त्या पैशाचा उपयोग कसा व्हावा, बेजबाबदार पद्धतीने केला यांचे विवेचन केले आहे. दि. ३० सप्टेबर १९२० ला त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिकस अँड पोलिटिकल सायन्स या संस्थेत एम.एस.सी. पदवीसाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी ग्रेज इन या संस्थेत नाव दाखल करून बॅरिस्टर पदवीसाठी अभ्यास केला. प्रोव्हिन्शियल डी सेट्रालायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया या प्रबंधास २० जून १९२१ ला लंडन विद्यापीठाने एम.एस.सी. ही पदवी दिली. ग्रेज इन संस्थेने २८ जून १९२२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बार-ॲट-लॉ ही पदवी प्रदान केली. याच काळात डॉ. बाबासाहेब यांनी डी.एस.सी. पदवीसाठी अभ्यास सुरु केला. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन चव्हाण अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध त्यांनी जानेवारी ते मार्च १९२३ चे दरम्यान सादर केला होता. बाबासाहेब यांच्या या प्रबंधामुळे ब्रिटीश शासनाला विचार करावा लागला. या ग्रंथात उपस्थित केलेले प्रश्न अजूनही सुटलेले नाही. आजही रुपयाची किंमत जगाच्या चलनाच्या तुलनेने कमी आहे. अर्थव्यवस्थेचा मध्यबिंदू सुवर्ण परिमाण असला पाहिजे आणि माणूस हा अर्थ व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असला पाहिजे या बाबासाहेबांच्या भूमिकेनुसार अर्थव्यवस्था विकसित केली गेली नाही. परिणामी विषमता तशीच राहिल्याचे दिसत आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब यांचे अर्थ विषयक धोरणाची जनजागृती जगभर करण्याची गरज जाणवत आहे. त्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून सदरची परिषद लोकहितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. असे मत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.