दौंड येथे नवनिर्मित उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार….
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व भव्य शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे.
दौंड (बारामती झटका)
पुणे जिल्ह्यातील दौंड येथे महसूल विभागाचे नवनिर्मित उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार दि. 10/12/2023 रोजी दुपारी 04 वाजता दौंड येथील इरिगेशन कॉलनी, प्रशासकीय इमारत येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असे दौंडचे उपविभागीय अधिकारी श्री. मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार श्री. अरुण शेलार यांनी शासकीय निमंत्रण पत्रिकेत नमूद केलेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे भाग्यविधाते ॲड. राहुल सुभाष कुल यांनी नवीन प्रांत कार्यालय दौंड येथे व्हावे यासाठी सततचा पाठपुरावा केलेला होता. नवनिर्मित प्रांत कार्यालय उद्घाटन निमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा व जाहीर सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक दौंड येथे कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट आमदार ॲड. राहुल सुभाष कुल यांनी नवीन प्रांत कार्यालय व भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.